नाशिक, (प्रतिनिधी) २ जुलै - महाराष्ट्रात मान्सूनच्या पहिल्या आवर्तनाचा पाऊस सक्रिय झाला असून संकष्टी चतुर्थीपासून ते संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थानादरम्यान राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. आजपासून (२ जुलै) पुढील आठवडाभर म्हणजेच बुधवार, दिनांक ८ जुलै २०२६ पर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकण, विदर्भ आणि खान्देशात मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाचे (IMD) निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.
३ आणि ४ जुलैला 'अति-मुसळधार'; मुंबईत जनजीवन विस्कळीत होण्याचा धोका
माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेषतः ३ आणि ४ जुलै रोजी राज्यात पावसाचा जोर प्रचंड असेल.
घाट क्षेत्र: नाशिक, पुणे आणि सातारा या तीन जिल्ह्यांतील घाट क्षेत्रात अति-मुसळधार पाऊस होईल.
विदर्भ: अकोला, अमरावती, गोंदिया, नागपूर, भंडारा, वध्र्या, बुलढाणा आणि चंद्रपूर जिल्ह्यातही या दोन दिवसांत मुसळधार ते अति-मुसळधार पाऊस अपेक्षित आहे.
मुंबई व कोकण: मुंबई शहर, उपनगर, पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या ६ जिल्ह्यांत ३ ते ६ जुलै दरम्यान कोसळणाऱ्या अतिजोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊ शकते. पाण्याचा वेळेत निचरा न झाल्यास जनजीवन काहीसे विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
पालखी प्रस्थानाला पाऊस, पुणे मुक्कामात काहीसा दिलासा
आषाढी वारीसाठी प्रस्थान ठेवणाऱ्या पालख्यांविषयी माहिती देताना खुळे यांनी सांगितले की, मंगळवार आणि बुधवार (७-८ जुलै) रोजी पालखी प्रस्थान सोहळ्यादरम्यान पावसाची शक्यता कायम राहील. मात्र, पालख्यांचा पुण्यात मुक्काम असताना पावसाचा जोर काहीसा कमी होईल, ज्यामुळे वारकऱ्यांना दिलासा मिळू शकतो.
पाऊस कशामुळे वाढला?
सध्या देशात समुद्रसपाटीवरील हवेच्या कमी दाबाचा हंगामी आस सरासरी जागेवर स्थिर आहे. तसेच, अरबी समुद्रात महाराष्ट्र-कोकण किनारपट्टी दरम्यान द्रोणीय आस (Trough) निर्माण झाला असून, बंगालच्या उपसागरातील मध्य तपांबरात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या तीन प्रमुख हवामान प्रणालींमुळे संपूर्ण महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.
९ जुलैनंतर जोर ओसरणार; जुलैमध्ये पावसाची तूट राहण्याची भीती
गुरुवार, ९ जुलैपासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. ९ ते १५ जुलै दरम्यान विदर्भात अपेक्षित असलेला मोठा पाऊसही यामुळे मावळला आहे. एकूणच अंदाज पाहता, विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जून महिन्यातील पावसाची तूट जुलैमध्येही कायम राहू शकते, असा अंदाज आहे.
पेरणीबाबत १० जुलै रोजीच खुलासा शक्य
जूनमधील तूट आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यातील पाऊस या सर्व बाबींचा विचार करता, शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी या संदर्भातील सविस्तर आणि स्पष्ट खुलासा १० जुलैच्या दरम्यानच करता येईल, असे माणिकराव खुळे यांनी पत्रात नमूद केले आहे.
मुसळधार पावसाचा इशारा असलेल्या दिवसांमध्ये नागरिकांनी, विशेषतः घाट क्षेत्रात प्रवास करताना आणि मुंबई-कोकण पट्ट्यात प्रवास करताना स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.