चेन्नई, (प्रतिनिधी) २ जुलै - तामिळनाडूच्या राजकारणात ऐतिहासिक विजय मिळवून सत्तेवर आलेले अभिनेते आणि नवनियुक्त मुख्यमंत्री थलपथी विजय (Thalapathy Vijay) यांनी प्रशासनावर आपली पकड मजबूत करत एक अत्यंत मोठा आणि धाडसी निर्णय घेतला आहे. मागील द्रमुक (DMK) सरकारच्या काळात हिंदू धार्मिक आणि धर्मादाय विभागांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या तब्बल २४५.८५ कोटी रुपयांच्या ४६ प्रकल्पांची प्रशासकीय मंजुरी मुख्यमंत्री विजय यांनी रद्द केली आहे. "हिंदू मंदिरांच्या निधीचा वापर व्यावसायिक उद्देशांसाठी न करता, तो पैसा केवळ मंदिरे आणि भाविकांच्या कल्याणासाठीच खर्च व्हावा," अशी रोखठोक भूमिका मुख्यमंत्री विजय यांनी घेतली आहे.
व्यावसायिक संकुलांना आणि विवाह सभागृहांना ब्रेक
मागील सरकारच्या काळात मंदिरांच्या मालकीच्या जागेवर आणि निधीतून मोठी विवाह सभागृहे (मैरेज हॉल्स) आणि व्यावसायिक संकुले (शॉपिंग मॉल्स) उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. या प्रकल्पांना आता नव्या सरकारने पूर्णपणे स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे वाचलेला २४५ कोटींहून अधिकचा निधी आता मंदिरांची जीर्णोद्धार दुरुस्ती, भाविकांसाठी पायाभूत सोयी-सुविधा आणि धार्मिक सेवा कल्याण योजनांवर खर्च केला जाणार असल्याचे तामिळनाडू सरकारने स्पष्ट केले आहे.
'थलपथी' विजय यांच्या सुशासनाचा धडाका!
४ मे २०२६ रोजी झालेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सी. जोसेफ विजय (थलपथी विजय) यांच्या पक्षाने गेल्या सहा दशकांपासून सत्तेत असलेल्या प्रमुख द्रविड पक्षांना (DMK आणि AIADMK) धूळ चारत सत्ता स्थापन केली. १० मे रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सुरुवातीला त्यांच्या प्रशासकीय अनुभवावर विरोधकांनी शंका उपस्थित केल्या होत्या, मात्र पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी घेतलेल्या धडाकेबाज निर्णयांमुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक होत आहे:
राजकीय हस्तक्षेपमुक्त पोलीस दल: मुख्यमंत्री विजय यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रमुखांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी.
कडक वक्तशीरपणा: मुख्यमंत्री स्वतः दररोज वेळेवर सचिवालयात पोहोचतात आणि सोमवार ते शुक्रवार सुमारे सात तास कार्यालयीन कामकाज करतात. त्यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही वेळेचे पालन करण्याचे कडक आदेश दिले आहेत.
सर्व सरकारी बसेस 'AC' होणार: राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास सुकर करण्यासाठी राज्यातील सर्व सार्वजनिक वाहतूक बसेस वातानुकूलित (AC) करण्याची मोठी घोषणा त्यांनी केली आहे.
२०३५ पर्यंत १.५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; नीती आयोगाकडून कौतुक
मुख्यमंत्री विजय यांनी २०३५ पर्यंत तामिळनाडूची अर्थव्यवस्था १.५ ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे, ज्याचे नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोक कुमार लाहिरी यांनी कौतुक केले आहे. तसेच, तामिळनाडूच्या आर्थिक स्थितीवर 'श्वेतपत्रिका' प्रसिद्ध करून त्यांनी राज्याच्या कर्जभाराची माहिती जनतेसमोर ठेवत आर्थिक पारदर्शकतेचे आश्वासन दिले आहे.
नव्या सरकारचे सार्वजनिक कल्याणाचे मोठे निर्णय:
अम्मा कॅन्टीनचे आधुनिकीकरण: राज्यातील ६२० 'अम्मा कॅन्टीन'चे आधुनिकीकरण करून तिथे नवीन भांडी आणि स्वच्छतेत सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांसाठी पॅकेज: भातशेतीला आणि बळीराजाला चालना देण्यासाठी १३४.८३ कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.
कर्जमाफी आणि जल जीवन: गरीब कर्जदारांसाठी सहकारी बँक कर्जमाफीचा पहिला टप्पा जाहीर करण्यात आला असून, रखडलेले 'जल जीवन मिशन' प्रकल्प युद्धपातळीवर पुन्हा सुरू करण्यात आले आहेत.