राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज... 'या' भागांना अतिवृष्टीचा इशारा...

Share:
Main Image
Last updated: 02-Jul-2026

पुणे, (प्रतिनिधी) २ जुलै - महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा (ऑफ-शोअर ट्रफ) कमालीचा सक्रिय झाला असून, मध्य-ट्रोपोस्फेरिक द्रोणीय रेषा मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण परिसरातून पसरली आहे. या बदललेल्या हवामान प्रणालीमुळे पुढील काही दिवस राज्यात मान्सून आणखी सक्रिय होणार असून ६ जुलैपर्यंत अनेक भागांत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपसचिव दत्तात्रय कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत राज्यातील विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे.

कोणत्या भागात कसा असेल पाऊस?

कोकण आणि गोवा: कोकण किनारपट्टीवर बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः २ ते ४ जुलै दरम्यान कोकणातील काही भागांसाठी अतिवृष्टीचा (रेड/ऑरेंज अलर्ट) इशारा देण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्र: मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी चांगल्या पावसाचा अंदाज असून, २ आणि ३ जुलै रोजी घाटमाथ्यावर अत्यंत मुसळधार पाऊस कोसळू शकतो. तर ४ ते ६ जुलै या कालावधीत मध्य महाराष्ट्रातील काही मैदानी भागांतही अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे.

विदर्भ आणि मराठवाडा: विदर्भात जवळपास सर्वच भागांत व्यापक पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात २ आणि ३ जुलै रोजी पावसाचा जोर वाढेल, तर इतर दिवशी तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.

विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचे सावट

Advertisement

३० जून ते ४ जुलै या पाच दिवसांच्या कालावधीत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी विजा चमकत असताना झाडांखाली किंवा खुल्या मैदानात आश्रय न घेता विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

घाटात दरडी कोसळण्याचा धोका; मच्छीमारांना बंदी

सततच्या मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचून शहरी भागातील रस्ते जलमय होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई-पुणे किंवा नाशिक मार्गावरील घाट रस्त्यांवर दरडी कोसळण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी प्रवासाला निघण्यापूर्वी वाहतूक व रस्त्यांची अद्ययावत माहिती घेऊनच बाहेर पडावे. दरम्यान, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या प्रतिकूल हवामानामुळे मच्छीमारांनी पुढील काही दिवस समुद्रात जाणे पूर्णपणे टाळावे, अशा कडक सूचना देण्यात आल्या आहेत.

 बळीराजासाठी महत्त्वाचा सल्ला:

अतिरिक्त पाण्याचा निचरा करा: मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता, भातशेती व भाजीपाल्याच्या रोपवाटिकांमध्ये साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा त्वरित निचरा करण्याची व्यवस्था करावी.

जनावरांची काळजी घ्या: मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटाच्या काळात पशुपालकांनी आपल्या जनावरांना खुल्या जागेत न बांधता सुरक्षित गोठ्यात ठेवावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.