चोरांचा सुळसुळाट... येवल्यात दोन मेडिकल फोडले... त्र्यंबकला पालखी सोहळ्यात दागिने लंपास...

Share:
Main Image
Last updated: 01-Jul-2026

येवला/त्र्यंबकेश्वर, (प्रतिनिधी) १ जुलै - नाशिक जिल्ह्यात चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. येवला शहरात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री दोन मेडिकल स्टोअर्स फोडून रोख रकमेसह महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेली. तर दुसरीकडे, त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी एका भाविक महिलेच्या गळ्यातील १ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. या दोन्ही प्रकरणांत पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

१) येवला शहरात चोरट्यांचा सुळसुळाट; दोन मेडिकल एकाच रात्री फोडले

येवला शहरातील वेगवेगळ्या भागात रविवारी (दि. २८) रात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत दोन मेडिकल स्टोअर्सना लक्ष्य केले. याप्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात एकत्रित घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२५ हजारांची रोकड चोरीला:

पुरुषोत्तम बंकटलाल राठी (रा. स्वामी समर्थनगर, पारेगाव रोड, येवला) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. राठी यांचे त्यांच्या घराच्या परिसरातच 'सुरज मेडिकल स्टोअर्स' नावाचे दुकान आहे. रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी हे दुकान फोडून गल्ल्यातील २५ हजार रुपयांची रोकड आणि दुकानातील महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेली.

दुसऱ्या दुकानावरही डल्ला:

Advertisement

सुरज मेडिकल फोडल्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा अफजल अरशद देशमुख यांच्या 'न्यू आदर्श मेडिकल स्टोअर्स'कडे वळवला. चोरट्यांनी हे दुकानही फोडले आणि गल्ल्यात ठेवलेली ५ हजार रुपयांची रोकड व महत्त्वाची कागदपत्रे लंपास केली. या दुहेरी चोरीमुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. पोलीस हवालदार ठाकरे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

२) त्र्यंबकेश्वरला पालखी मिरवणुकीत 'हात की सफाई'; भाविक महिलेचे दागिने गायब

आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यात चोरट्यांनी भाविकांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गर्दीत एका महिलेच्या गळ्यातील सुमारे एक लाख रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या पोती चोरट्यांनी लंपास केल्या. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दर्शनासाठी गेले आणि घात झाला:

रामदास भाऊराव आहिरे (रा. समर्थनगर, पंचवटी, नाशिक) यांनी या संदर्भात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आहिरे दांपत्य सोमवारी (दि. २९) देवदर्शनासाठी त्र्यंबकेश्वर येथे गेले होते. त्र्यंबकराजाचे दर्शन घेतल्यानंतर हे दांपत्य आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याच्या मिरवणुकीत सहभागी झाले.

पालखी मिरवणुकीत दर्शन घेत असताना आणि गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी रामदास आहिरे यांच्या पत्नी सुमन यांच्या गळ्यातील दोन तोळे एक ग्रॅम वजनाची शॉटपोत आणि मनी मंगळसूत्र (किंमत सुमारे १ लाख रुपये) अतिशय चालाखीने ओरबाडून नेले. या घटनेमुळे पालखी सोहळ्यातील भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलीस नाईक धात्रक या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.