नाशिक, (प्रतिनिधी) ३० जून - आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ स्वच्छ, सुरक्षित आणि संपूर्णपणे पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने कंबर कसली आहे. कुंभमेळा क्षेत्रातील स्वच्छतेचा दर्जा राखण्यासाठी सुमारे ५६ हजार तात्पुरती स्वच्छतागृहे उभारण्यात येणार असून, चोवीस तास स्वच्छतेसाठी ८ हजारांहून अधिक सफाई कर्मचाऱ्यांची फौज तैनात केली जाणार आहे. तसेच, यंदाचा सिंहस्थ मेळा हा पूर्णपणे 'एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकपासून मुक्त' (Single-use Plastic Free) करण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याची माहिती प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
साधूग्राम ते महामार्गापर्यंत ५६ हजार स्वच्छतागृहे
कुंभमेळ्यादरम्यान येणाऱ्या लाखो भाविकांची आणि साधू-महंतांची गैरसोय टाळण्यासाठी साधूग्राम, मुख्य घाट परिसर, पार्किंग लॉट्स, होल्डिंग एरिया, शहरातील प्रमुख रस्ते तसेच महामार्गांलगत तब्बल ५६ हजार तात्पुरत्या स्वच्छतागृहांची उभारणी केली जाईल. यात्रेकरूंना स्वच्छतेच्या मूलभूत सुविधा अगदी सहज उपलब्ध व्हाव्यात, असे नियोजन प्राधिकरणाने केले आहे.
डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे स्वच्छतेवर 'वॉच'
मुख्य घाटांवर आणि महत्त्वाच्या ठिकाणी सुमारे ७ हजार कचरापेट्या (डस्टबीन) ठेवण्यात येणार असून, त्यामध्ये ९ लाखांहून अधिक लाईनर्स बॅग वापरल्या जातील. या बॅग दिवसातून तीन वेळा बदलण्यात येणार आहेत. संपूर्ण कुंभक्षेत्रात झाडलोट, घाटांची स्वच्छता आणि स्वच्छतागृहांची चोवीस तास देखभाल करण्यासाठी ८ हजारांहून अधिक सफाई कर्मचारी तैनात राहतील. विशेष म्हणजे, या संपूर्ण मनुष्यबळाच्या कामावर माहिती व संपर्क तंत्रज्ञान (ICT) आधारित डिजिटल प्रणालीद्वारे बारकाईने देखरेख ठेवली जाणार आहे.
महिला भाविकांसाठी २ हजार चेंजिंग रूम
महिला यात्रेकरूंची अडचण लक्षात घेऊन घाटांवर सुमारे २ हजार वस्त्रपरिवर्तन कक्ष (चेंजिंग रूम) उभारण्यात येणार आहेत. याशिवाय, घनकचरा व्यवस्थापनासाठी १०० हून अधिक अतिरिक्त कचरा वाहने, टिपर आणि कॉम्पॅक्टर्स उपलब्ध केले जातील. घाटांवर कचरा साचू नये म्हणून तातडीच्या प्रतिसादासाठी विशेष 'क्विक रिस्पॉन्स' पथके आणि मुख्य ठिकाणी कचरा हस्तांतरण केंद्रे उभारली जाणार आहेत.
अन्नछत्रांमध्ये पत्रावळी; 'प्लास्टिक'ला फाटा
सिंहस्थ पूर्णपणे प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्राधिकरणाने कडक पावले उचलली आहेत. कुंभमेळ्यातील अन्नछत्रे आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांमध्ये पत्रावळी, द्रोण आणि मातीचे कुल्हड यांसारख्या जैवविघटनशील (Biodegradable) पर्यायांचा वापर अनिवार्य आणि प्रोत्साहित केला जाणार आहे. याशिवाय ठिकठिकाणी रिव्हर्स व्हेंडिंग मशीन, बॅग व्हेंडिंग मशीन बसवून कापडी पिशव्यांचे वितरण केले जाईल.
गोदावरी नदीसाठी 'रिव्हर स्किमर्स'
पवित्र गोदावरी नदी प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी निर्माल्य, फुले आणि पाण्यात तरंगणारा कचरा त्वरित हटविण्याची स्वतंत्र हायटेक व्यवस्था असेल. यासाठी आधुनिक 'रिव्हर स्किमर्स', स्वच्छता नौका, फ्लोटिंग बॅरियर्स आणि हँड नेट्सचा वापर करण्यात येणार असून, केवळ घाटांवरील नदी स्वच्छतेसाठी स्वतंत्र मनुष्यबळ तैनात केले जाणार आहे.
अडीच वर्षे चालणार महा-स्वच्छता अभियान
प्राधिकरणाच्या माहितीनुसार, जानेवारी २०२६ ते जुलै २०२८ या अडीच वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत संपूर्ण नाशिक जिल्ह्यात व्यापक स्वच्छता जनजागृती अभियान राबविले जात आहे. यामध्ये स्वच्छतेची शपथ, सायक्लोथॉन, प्लॉगथॉन, मानवी साखळी, निर्माल्य संकलन आणि 'क्लीन घाट' यांसारख्या उपक्रमांचा समावेश असून, त्याला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे.
"सिंहस्थ कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक असून, त्याची स्वच्छता राखणे हे सार्वजनिक आरोग्याबरोबरच लोकांच्या श्रद्धेशी जोडलेले आहे. यासाठी आम्ही उच्च दर्जाचे व्यवस्थापन आणि आधुनिक यंत्रणा सज्ज करत आहोत," असे आयुक्त शेखर सिंह यांनी स्पष्ट केले.
सिंहस्थ स्वच्छता आराखडा: एका नजरेत
तात्पुरती स्वच्छतागृहे: सुमारे ५६ हजार
सफाई कर्मचारी फौज: ८ हजारांहून अधिक
घाट कचरापेट्या: सुमारे ७ हजार
लाईनर्स बॅग: ९ लाखांहून अधिक (दिवसातून ३ वेळा बदल)
वस्त्रपरिवर्तन कक्ष: सुमारे २ हजार
अतिरिक्त कचरा वाहने: १०० हून अधिक
जनजागृती अभियानाचा काळ: जानेवारी २०२६ ते जुलै २०२८