३ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य... भारताची ऑस्ट्रेलिया मध्ये ऐतिहासिक कामगिरी... हा मराठी खेळाडू चमकला...

Share:
Main Image
Last updated: 30-Jun-2026

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) ३० जून - ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या प्रतिष्ठित ‘ग्लोबल स्किल्स चॅलेंज २०२६’ (Global Skills Challenge 2026) या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय संघाने आपल्या कौशल्याचा डंका वाजवत एकूण ५ पदकांची घवघवीत कमाई केली आहे. यामध्ये ३ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य पदकाचा समावेश आहे. या वर्षाच्या अखेरीस शांघाय येथे होणाऱ्या ‘४८ व्या वर्ल्डस्किल्स स्पर्धे’च्या पार्श्वभूमीवर भारताचे हे यश अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे. २३ ते २९ जून २०२६ दरम्यान आयोजित या स्पर्धेत अमेरिका, चीन, जपान, फ्रान्स, कोरिया आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या जगातील १६ बलाढ्य देशांमधील सुमारे ६०० स्पर्धक व तज्ज्ञांनी सहभाग घेतला होता. या कड्या स्पर्धेत भारताच्या ३० सदस्यीय चमूने (१५ स्पर्धक आणि १५ तज्ज्ञ) एकूण १५ वेगवेगळ्या कौशल्य श्रेणींमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले.

भारताचे मानकरी: सुवर्ण आणि रौप्य पदकांचे विजेते

भारतीय तरुणांनी प्रगत तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्रात आपली जागतिक स्पर्धात्मकता सिद्ध केली आहे. विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे:

पवन भद्रावती सुरेश (कर्नाटक): 'अ‍ॅडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग' (Additive Manufacturing) मध्ये सुवर्ण पदक पटकावले. (जपानला रौप्य).

मौसम कुमार गिरी (बिहार): 'क्लाउड कम्प्युटिंग' मध्ये सुवर्ण पदक मिळवले. (जपानला रौप्य, सिंगापूरला कांस्य).

विष्णू प्रिया सुनील (दिल्ली): 'हेल्थ अँड सोशल केअर' मध्ये सुवर्ण पदक संपादन केले. (ऑस्ट्रेलियाला रौप्य).

हर्ष रमेश पवार (महाराष्ट्र): '३डी डिजिटल गेम आर्ट' मध्ये रौप्य पदक पटकावून महाराष्ट्राचे नाव उंचावले.

Advertisement

मुस्कान (हरियाणा): 'पेंटिंग अँड डेकोरेटिंग' मध्ये कांस्य पदक मिळवले.

मूल्यमापनाचे जागतिक निकष

या संपूर्ण स्पर्धेत स्पर्धकांचे मूल्यांकन जागतिक पातळीवर मान्यताप्राप्त 'कॉम्पिटिशन इन्फॉर्मेशन सिस्टीम' (CIS) द्वारे करण्यात आले. वर्ल्डस्किल्स आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ज्या कडक मूल्यमापन पद्धतीचा वापर केला जातो, तशीच प्रणाली येथेही वापरण्यात आल्यामुळे भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे.

देशासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब: जयंत चौधरी

भारतीय संघाच्या या यशाबद्दल कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जयंत चौधरी यांनी खेळाडूंचे कौतुक केले. ते म्हणाले, "मिळवलेली ५ पदके ही देशासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. हे यश आपले खेळाडू, तज्ज्ञ आणि मार्गदर्शकांच्या कठोर परिश्रमांची साक्ष देते. या कामगिरीमुळे आपल्या तरुणांना जागतिक मानकांची ओळख झाली असून, शांघाय येथील आगामी 'वर्ल्डस्किल्स' स्पर्धेसाठी आपल्या पूर्वतयारीला मोठी बळकटी मिळाली आहे."

डिजिटल तंत्रज्ञान, प्रगत उत्पादन आणि सर्जनशील उद्योगात भारताचे तरुण आता जागतिक स्तरावर नेतृत्व करण्यास सज्ज झाले असल्याचे या निकालांवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.