नंदिनी नदीपात्रातील आरसीसी चेंबरचे काम... मनपा आणि पर्यावरणप्रेमी आमनेसामने...

Share:
Main Image
Last updated: 30-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ३० जून - नंदिनी नदीपात्रातून सुरू असलेल्या सांडपाणी पाईपलाईन व आर.सी.सी. चेंबर बांधकामाबाबत नाशिक महानगरपालिकेने दिलेल्या उत्तरावर पर्यावरणप्रेमींनी तीव्र आक्षेप घेतला आहे. मनपाचे उत्तर आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील काम यात मोठी विसंगती असल्याचा आरोप करत 'निसर्गसेवक युवा मंचा'ने मा. विभागीय आयुक्त (उच्च न्यायालय आदेशित गोदावरी प्रदूषण नियंत्रण समितीचे अध्यक्ष) आणि मनपा आयुक्तांकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे. न्यायालयीन आदेशांचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर लढाईसह तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही मंचाने दिला आहे.

मनपाचा दावा खोटा? प्रत्यक्ष कामात मोठी विसंगती!

निसर्गसेवक युवा मंचाचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महानगरपालिकेने आपल्या उत्तरात म्हटले होते की, नदीपात्रातील जुनी विटांची चेंबर्स पाडून त्याऐवजी नवीन आर.सी.सी. चेंबर्स उभारण्यात येत आहेत. मात्र, पर्यावरणप्रेमींनी जेव्हा प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली, तेव्हा धक्कादायक बाब समोर आली. जुनी विटांची चेंबर्स पाडलेलीच नसून, ती तशीच ठेवून नदीपात्रात अगदी शेजारी नवीन आर.सी.सी. चेंबर उभारले जात आहे. मनपाच्या या दिशाभूल करणाऱ्या माहितीमुळे पर्यावरणप्रेमी संतापले असून त्यांनी मनपाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

'नीरी'च्या नियमांचे काय झाले? निवेदनाद्वारे थेट सवाल

नदीपात्रात कोणतेही कायमस्वरूपी बांधकाम न करण्याचे मा. उच्च न्यायालयाचे कडक निर्देश आहेत. असे असताना हे बांधकाम नेमक्या कोणत्या सक्षम प्राधिकरणाच्या मंजुरीने सुरू आहे, असा सवाल निवेदनातून विचारण्यात आला आहे.

परवानग्या सार्वजनिक करा: या कामासाठी पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन (EIA) अहवाल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची (MPCB) मंजुरी, मंजूर आराखडे आणि तांत्रिक अहवाल सार्वजनिक करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Advertisement

निळी पूररेषा व 'नीरी'चे नियम: उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नदीपात्रातील कामांबाबत 'नीरी' (NEERI) संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन झाले आहे का? सांडपाणी वाहिनी निळ्या पूररेषेच्या बाहेर नेण्याबाबतच्या सूचनांचा विचार का केला गेला नाही? याबाबत मनपाने स्पष्टीकरण द्यावे, असे निवेदनात नमूद आहे.

७ दिवसांचा अल्टिमेटम; अन्यथा जनआंदोलन!

निसर्गसेवक युवा मंचाने संबंधित कामाची सर्व प्रमाणित कागदपत्रे ७ दिवसांच्या आत उपलब्ध करून देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. ही माहिती न मिळाल्यास न्यायालयात दाद मागण्यासोबतच, नाशिकमधील विविध सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सहभागातून लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

"आम्ही विकासाच्या विरोधात नाही, पण..."

"नंदिनी नदी ही नाशिकच्या पर्यावरणीय आणि सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. नदीपात्रातील कोणतेही काम पूर्ण पारदर्शकतेने आणि न्यायालयीन आदेशांचे पालन करूनच झाले पाहिजे. आम्ही शहराच्या विकासाच्या विरोधात अजिबात नाही; मात्र नदीचे अस्तित्व धोक्यात आणणाऱ्या कोणत्याही मनमानी निर्णयाला आम्ही ठामपणे विरोध करू."

- अमित कुलकर्णी (अध्यक्ष, निसर्गसेवक युवा मंच)

Advertisement

Comments

No comments yet.