नाशिक, (प्रतिनिधी) २८ जून - नाशिक जिह्यात आत्महत्येचे सत्र थांबता थांबेनासे झाले आहे. शुक्रवारी (दि. २६) जिह्यात वेगवेगळ्या तीन ठिकाणी तिघांनी गळफास लावून घेत आपली जीवनयात्रा संपवली. यामध्ये एका अनोळखी व्यक्तीसह दोघांचा समावेश आहे. या तिन्ही घटनांमधील आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. याप्रकरणी अनुक्रमे बाऱ्हे, जायखेडा आणि इगतपुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे:
१. सुरगाणा तालुक्यात वृद्धाची झाडाला गळफास लावून आत्महत्या
बाऱ्हे: पहिली घटना सुरगाणा तालुक्यातील सांबरखल येथे घडली. येथील रहिवासी जयराम सोनूजी शेवरे (वय ६७) या वृद्धाने शुक्रवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या चमेलीच्या झाडाला दोरी बांधून गळफास लावून घेतला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत मृत वृद्धाचा मुलगा माणिक शेवरे यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यांच्या खबरीवरून बाऱ्हे पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस हवालदार गायकवाड पुढील तपास करीत आहेत.
२. रावळगाव येथे ५० वर्षीय व्यक्तीची घरातच आत्महत्या
जायखेडा: दुसरी घटना मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथे समोर आली. येथील रहिवासी राजेंद्र यादव शिंदे (वय ५०) यांनी शुक्रवारी सकाळी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील किचनमध्ये गळफास लावून घेतला. हा प्रकार नातेवाईक राहुल पवार यांच्या निदर्शनास येताच त्यांनी शिंदे यांना तातडीने नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच वैद्यकीय सूत्रांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी वार्डबॉय विलास बागुल यांनी दिलेल्या खबरीवरून जायखेडा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, जमादार सोनवणे तपास करीत आहेत.
३. इगतपुरीत बीएसएनएल टॉवरजवळ अनोळखीचा गळफास
इगतपुरी: तिसरी घटना इगतपुरी शहरातील बारा बंगला परिसरात उघडकीस आली. येथील रेल्वे विभागाच्या जागेत असलेल्या बीएसएनएल टॉवर भागात शुक्रवारी दुपारच्या सुमारास एका ४० ते ४५ वयोगटातील अनोळखी व्यक्तीने करंजीच्या झाडाला गळफास लावून घेतल्याचे आढळून आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत जहांगिर खान यांनी दिलेल्या खबरीवरून इगतपुरी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस जमादार परदेशी या अनोळखी व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत असून पुढील तपास करीत आहेत.