मान्सून कुठपर्यंत पोहोचला? मुंबई, नाशिकमध्ये केव्हा येणार? असा आहे हवामान अंदाज...

Share:
Main Image
Last updated: 22-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २२ जून - दीर्घप्रतीक्षेनंतर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. तब्बल १४ दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर मान्सूनने महाराष्ट्रात पुन्हा एकदा आगेकूच केली आहे. मान्सूनची अरबी समुद्राची शाखा सक्रिय झाल्याने त्याने कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बऱ्याचशा भागात प्रगती केली असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे (IMD) निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.

मान्सून कुठपर्यंत पोहोचला?

सोमवार, दि. २२ जून रोजी मान्सूनने राज्याच्या खालील भागांत अधिकृतपणे प्रवेश केला आहे:

कोकण: रत्नागिरी जिल्हा ओलांडून थेट रायगड जिल्ह्यातील अलिबागपर्यंत मान्सून पोहोचला आहे.

मध्य महाराष्ट्र: सातारा आणि सोलापूर जिल्हे ओलांडून पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी आणि पुणे शहरापर्यंत मान्सूनने मजल मारली आहे. तसेच दक्षिण अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत आणि जामखेडपर्यंत मान्सून सक्रिय झाला आहे.

मराठवाडा: धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांचा बराचसा भाग मान्सूनने व्यापला आहे.

विदर्भ: तेलंगणा राज्यामधून पुढे सरकत मान्सून दक्षिण विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील 'सिरोंचा' तालुक्याच्या प्रवेशद्वारापर्यंत येऊन ठेपला आहे.

मुंबईत येत्या २ ते ३ दिवसांत आगमनाची शक्यता

Advertisement

सध्या मान्सून पोहोचलेल्या सर्वच ठिकाणी पाऊस सुरू झाला नसला, तरी मान्सूनचे वारे तेथपर्यंत पोहोचले आहेत. पुढील वाटचालीसाठी वातावरण अत्यंत अनुकूल असून, येत्या २-३ दिवसांत मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात मान्सून वेगाने पुढे झेपावेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कशामुळे मिळाली मान्सूनला गती?

हवेच्या दाबाच्या प्रणालीत झालेल्या महत्त्वपूर्ण बदलांमुळे मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे:

१. समुद्रसपाटीच्या पातळीवर असणारा हवेच्या कमी दाबाचा पूर्व-पश्चिम आस काहीसा दक्षिणेकडे सरकला असून, तो आता पंजाब-हरियाणाऐवजी राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहारमधून जात आहे.

२. वायव्येकडून वाहणाऱ्या कोरड्या व उष्ण वाऱ्यांचा जोर आता ओसरला आहे.

३. अरबी समुद्रात साडेतीन ते पावणेचार किलोमीटर उंचीवर असलेली प्रत्यावर्ती वाऱ्यांची (Anticyclone) प्रणाली विरळ झाली आहे. यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांना मोठी बळकटी मिळाली आहे.

सावधान! विदर्भात उष्णतेचा कडाका कायम

महाराष्ट्राच्या इतर भागात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार होत असतानाच, विदर्भाला मात्र सध्या उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. आजपासून पुढील ४ दिवस म्हणजेच शुक्रवार, दि. २६ जूनपर्यंत विदर्भातील विविध भागांत तीव्र उष्णतेची लाट (Heat Wave) आणि रात्रीचा असह्य उकाडा कायम जाणवेल, असा इशारा माणिकराव खुळे यांनी दिला आहे.

Advertisement

Comments

No comments yet.