दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) २२ जून - "नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीचा निकाल अत्यंत धक्कादायक आहे. महायुतीकडे कागदावर जवळपास पावणे पाचशे मतदारांचे भक्कम संख्याबळ असतानाही, आपल्या उमेदवाराला इतकी कमी मते का पडली? हे का झाले आणि ऐनवेळी कोणी पाठ फिरवली, हा खरा संशोधनाचा विषय आहे," अशी प्रांजळ कबुली भाजपचे ज्येष्ठ नेते व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. तसेच, या पराभवाचे मूळ शोधण्यासाठी निवडणुकीत नेमके काय घडले, याची सखोल चौकशी केली जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली. पराभवानंतर शिवसेना (शिंदे गट) उमेदवार नरेंद्र दराडे यांनी महायुतीतील नेत्यांवर केलेल्या 'विश्वासघाता'च्या आरोपांचा समाचार घेताना त्यांनी भाजपची बाजू स्पष्ट केली.
पावणे पाचशे मते असतानाही पराभव; आत्मपरीक्षणाची गरज!
माध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमधील धक्कादायक मतफुटीवर आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले, "आम्ही सर्वांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. नाशिक जिल्हा आणि महापालिकेत महायुतीचे मिळून जवळपास पावणे पाचशे मतदार असतानाही मतदारांनी कौल आमच्या बाजूने दिला नाही. अधिकृत उमेदवाराला मतदारांच्या संख्याबळापेक्षा खूपच कमी मते मिळाली आहेत. कोण आमच्या बाजूने उभे राहिले नाही आणि मते कुठे फुटली, याचा शोध घेणे आता अत्यंत आवश्यक झाले आहे."
दराडे सध्या रागात आणि नैराश्यात; महाजनांचा पलटवार
पराभवानंतर नरेंद्र दराडे यांनी "एकनाथ शिंदे सोडून महायुतीच्या सर्व नेत्यांनी माझा घात केला," असा थेट आरोप केला होता. यावर बोलताना महाजन म्हणाले, "झालेल्या अनपेक्षित पराभवामुळे नरेंद्र दराडे सध्या प्रचंड रागात आणि नैराश्यात आहेत, म्हणूनच ते असे आरोप करत आहेत. मात्र त्यांनी जाहीरपणे अशी वक्तव्ये करणे टाळावे. आमच्या किंवा भारतीय जनता पक्षाच्या रक्तात कोणाशीही गद्दारी करण्याचे संस्कार नाहीत."
सखोल चौकशी होणार!
नाशिकच्या या बंडखोरीमुळे आणि अंतर्गत मतफुटीमुळे महायुतीमधील दरी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाजन यांनी स्पष्ट केले की, या निवडणुकीत नक्की काय राजकारण झाले, कोणी अधिकृत उमेदवाराचे काम केले आणि कोणी पडद्यामागून बंडखोराला ताकद दिली, या सगळ्याची सखोल आणि सविस्तर चौकशी वरिष्ठ पातळीवरून केली जाईल.