त्या व्हायरल फोटोंबाबत मंत्री गिरीश महाजन यांचा मोठा खुलासा... ती मुलगी कोण हे सुद्धा केले स्पष्ट...

Share:
Main Image
Last updated: 21-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २१ जून - "काही दिवसांपासून माझ्याशी संबंधित काही खासगी कौटुंबिक फोटो आणि पोस्ट सोशल मीडिया, फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स (ट्विटर) व काही न्यूज पोर्टलवरून जाणूनबुजून प्रसारित केल्या जात आहेत. मात्र, या मूळ फोटोग्राफ्समध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, क्रॉपिंग आणि छेडछाड (मॉर्फिंग) करण्यात आली आहे," असा धक्कादायक खुलासा राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज (दि. २१) प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला असून तांत्रिक तपासातही फोटोंमध्ये फेरफार झाल्याचे प्रमाणित झाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. वस्तुस्थिती जनतेसमोर मांडताना मंत्री महाजन यांनी विरोधक आणि गैरप्रवृत्तींवर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे.

ते आमचे खासगी आणि घरगुती फोटो!

या फोटोंमागील सत्य सांगताना मंत्री महाजन म्हणाले की, "फोटोमध्ये दिसणारी मुलगी ही माझ्या घनिष्ठ कौटुंबिक संबंधातील आहे. आमचे घरगुती, कौटुंबिक व धार्मिक कार्यक्रमांत एकमेकांच्या घरी येणे-जाणे असते. त्यांचे कुटुंबीय व माझे कुटुंबीय यांचे माझ्यासोबतचे हे खाजगी फोटोग्राफ्स आहेत. दुर्दैवाने, तंत्रज्ञानाचा गैरवापर करून मूळ फोटोंमध्ये फेरफार करत जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा घाणेरडा प्रयत्न केला गेला आहे. ही महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती नाही."

सायबर पोलिसांकडून 'फेरफार' प्रमाणित; संबंधितांना नोटिसा

Advertisement

या विकृत प्रकाराची गंभीर दखल घेत मंत्री महाजन यांच्या वतीने सायबर पोलीस ठाण्यात कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा नोंदवला गेला आहे. सायबर पोलिसांनी तंत्रज्ञांचा वापर करून केलेल्या प्राथमिक तांत्रिक तपासाअंती, सदरील फोटोंमध्ये छेडछाड आणि फेरफार करून बदल करण्यात आल्याचे अधिकृतपणे प्रमाणित केले आहे.

पोलिसांनी या गुन्ह्याची दखल घेऊन संबंधित सोशल मीडिया अकाऊंट धारकांना तो आक्षेपार्ह मजकूर आणि फोटो तातडीने काढून टाकण्यासाठी कायदेशीर नोटिसा जारी केल्या आहेत.

अकाऊंट धारकांविरुद्ध कोर्टात जाणार; जनतेला आवाहन

"कायदेशीर प्रक्रिया सुरू असताना देखील काही सोशल मीडिया अकाऊंट्सवरून अजूनही हा बदनामीकारक मजकूर प्रसारित केला जात आहे. अशा अकाऊंट धारकांविरुद्ध आता थेट न्यायालयात जाऊन कायदेशीर कारवाईची दाद मागणार आहे," असा इशारा मंत्री महाजन यांनी दिला. तसेच, "सोशल मीडियाचा वापर करून व्यक्तिगत, कौटुंबिक आणि एका महिलेची बदनामी करण्याचा हा प्रयत्न असून यावरून राजकारणाची पातळी किती खाली गेली आहे हे स्पष्ट होते. जनतेने अशा कोणत्याही चुकीच्या आणि खोट्या पोस्टवर विश्वास ठेवू नये," असे आवाहन त्यांनी केले आहे.

सत्य लवकरच जनतेसमोर येईल आणि कायद्याच्या चौकटीत राहून दोषींवर कडक कारवाई होईल, असा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.

Advertisement

Comments

No comments yet.