पवनराजे खटल्याच्या निकालानंतर राजकीय भूकंप? ओमराजे निंबाळकरांच्या विधानामुळे ५ खासदारांची धाकधूक वाढली...

Share:
Main Image
Last updated: 21-Jun-2026

पुणे/मुंबई, (प्रतिनिधी) २१ जून - पवनराजे निंबाळकर हत्याकांड खटल्याच्या निकालानंतर महाराष्ट्र राजकारणात मध्यरात्रीच्या गुप्त घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आखले जाणारे 'ऑपरेशन टायगर' फेल करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रात्रीतून मोठी खेळी खेळली आहे. नाराज असलेले खासदार ओमराजे निंबाळकर यांची मनधरणी करण्यासाठी ठाकरेंनी आपले दोन अत्यंत विश्वासू नेते मध्यरात्रीच पुण्याला रवाना केले. आमदार वरुण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील हे उद्धव ठाकरेंचा थेट निरोप घेऊन तातडीने पुण्यात ओमराजेंच्या निवासस्थानी पोहोचले. दोन्ही नेत्यांनी ओमराजे निंबाळकर यांच्याशी बंद दाराआड प्रदीर्घ चर्चा केली असून, या खलबतांनंतर राज्याच्या राजकारणात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

ही कौटुंबिक धक्क्यावर चर्चा; वरुण सरदेसाईंचे वक्तव्य

ओमराजेंच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे सचिव आमदार वरुण सरदेसाई म्हणाले,

"ओम दादा यांच्याबाबत जो काही न्यायालयाचा निर्णय लागलाय, तो अपेक्षित नव्हता. पहिल्यांदा आमदार आणि नंतर तीन वेळा खासदार झालेल्या ओमराजेंच्या परिवाराला या निकालामुळे मोठा धक्का बसला आहे. आम्ही याच विषयावर आणि त्यांच्या पाठीशी राहण्याबाबत चर्चा केली. ते आजही आपल्याच पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार आहेत. काही गोष्टी गुप्त राखायच्या असतात, म्हणूनच आम्ही मध्यरात्री भेटलो."

तसेच आमदार कैलास पाटील यांनी विश्वास व्यक्त केला की, "उद्धव साहेबांच्या प्रति ओमराजेंची भावना आजही कायम आहे. त्यांनी २० वर्षे ज्या गोष्टीसाठी संघर्ष केला, त्यात न्याय न मिळाल्याने ते व्यथित आहेत. त्यांनी निर्णय घेण्यासाठी उद्याचा एक दिवस मागितला असून, ते पक्षातच राहतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे."

Advertisement

शिंदेंची 'युवासेना'ही मैदानात; घराबाहेर राडासदृश स्थिती

ठाकरे गटाचे नेते ओमराजेंच्या घरी पोहोचल्याची माहिती मिळताच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मध्यरात्रीच ओमराजेंच्या घराबाहेर जमा झाले. युवासेनेचे सचिव किरण साळी यांनी ठाकरे गटावर थेट हल्लाबोल केला. "दिवसा माध्यमांसमोर अपशब्द वापरायचे आणि दुसरीकडे मध्यरात्री या लोकांना भेटायची वेळ का आली? गरज पडली तर आम्ही ओमराजेंसोबत थेट धाराशिवला जाऊ," अशी आक्रमक भूमिका साळी यांनी घेतली. यामुळे मध्यरात्री ओमराजेंच्या घराबाहेर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

 काय आहे पार्श्वभूमी आणि ओमराजेंची भूमिका?

तब्बल वीस वर्षांनंतर पवनराजे हत्याकांड खटल्याचा निकाल लागला असून, कोर्टाने या खटल्यातील आठही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. हा खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी मोठा कौटुंबिक आणि भावनिक झटका मानला जात आहे. या निकालानंतर त्यांनी वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

खासदारकी धोक्यात?

बंडखोरी आणि 'ऑपरेशन टायगर'बाबत बोलताना ओमराजे म्हणाले, "मी मतदारसंघात जाऊन आधी माझ्या मतदारांशी चर्चा करणार आहे आणि त्यानंतरच माझा राजकीय निर्णय जाहीर करेन." ओमराजेंच्या या भूमिकेमुळे त्यांच्यासोबत फुटण्याच्या तयारीत असलेल्या इतर ५ खासदारांची खासदारकी सध्या तरी धोक्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Advertisement

Comments

No comments yet.