मुंबई, (प्रतिनिधी) २१ जून - "सध्या भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत ज्वालामुखी खदखदत असून आतून सगळे पेटलेले आहेत. केवळ नरेंद्र मोदी यांच्यामुळेच सर्व जण सध्या शांत आहेत. मात्र, येत्या काही दिवसांत केंद्रात आणि अनेक ठिकाणी मोठा गोंधळ उडेल. त्यामुळे मनसैनिकांनी तयार राहावे, वेळ येईल तेव्हा जमिनीत पाय रोवून उभे राहावे," असा खळबळजनक दावा आणि इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल (२० जून) मुंबईत केला. वांद्रे येथे आयोजित मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे जिल्हा आणि महानगरपालिका क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आपल्या खास 'ठाकरी' शैलीत राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील चालू फोडाफोडीच्या राजकारणावर, 'ऑपरेशन टायगर'वर आणि उद्धव ठाकरेंच्या फुटलेल्या खासदारांवर तीव्र शब्दांत प्रहार केला.
अमित शाह यांच्या पीएम पदाच्या तयारीमुळेच खासदार शिंदे गटात!
उद्धव सेनेचे ६ खासदार फुटून शिवसेना (शिंदे गटात) जाण्यामागचे गुपित उघड करताना राज ठाकरे म्हणाले,
"माझा एकच प्रश्न आहे—केंद्रात सत्ता कोणाची आहे? भाजपाची ना? मग हे खासदार भाजपामध्ये न जाता शिंदे सेनेत का गेले? यामागे एक मोठे कारण आहे. सन २०२९ मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे स्वतः पंतप्रधान होण्याची तयारी करत आहेत. हेच जर कारण नसते, तर ते ६ खासदार थेट भाजपामध्ये गेले असते."
"बरे झाले आपला खासदार निवडून आला नाही!"
महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणावर उद्वेग व्यक्त करताना राज ठाकरे म्हणाले, "स्वाभिमान गेला की उरतात फक्त जिवंत प्रेत! आज मतदारांच्या मताची किंमत शून्य झाली आहे. रांगेत उभे राहा, मतदान करा आणि मोकळे व्हा. हे आज भाजप कडून सुरू आहे, उद्या दुसरा पक्ष करेल. या पळवापळवीच्या राजकारणात आम्ही महाराष्ट्राचे अस्तित्व, स्वाभिमान आणि परंपरा विसरून चाललो आहोत. आज चहूबाजूंनी लोक विकली जात आहेत. हे सर्व पाहिल्यावर मनात आले, बरे झाले बाबा आपला खासदार निवडून नाही आला!"
'या' महत्त्वाच्या मुद्द्यांवरही ओढले आसूड:
शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्या: 'इंडियन एक्सप्रेस'च्या अहवालाचा हवाला देत राज ठाकरे म्हणाले, "देशात सर्वाधिक २२,१७४ आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. आज शेतकरी आणि 'नीट' (NEET) पेपरफुटीमुळे विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. राज्यात मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. सत्ताधारी मात्र आमदार, खासदार आणि नगरसेवक फोडण्यात व्यस्त आहेत."
महावितरण (MSEDCL) 'अदानीं'च्या घशात घालण्याचा डाव: "केंद्रीय अहवालानुसार महावितरणला १०० पैकी केवळ दीड मार्क मिळाला आहे. आता या कंपनीचा आयपीओ (IPO) आणला जात आहे. दीड टक्के रेटिंग असलेल्या कंपनीत कोण गुंतवणूक करणार? हा संपूर्ण प्रपंच महाराष्ट्राचा वीजपुरवठा 'अदानी' कंपनीच्या हातात सोपवण्यासाठीच सुरू आहे," असा गंभीर आरोप त्यांनी केला.
मतदार याद्या आणि जनगणनेतील 'षडयंत्र': आगामी जनगणनेवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करत राज ठाकरे म्हणाले की, काही ठिकाणी घरांची मोजणी करताना भाजपाचे लोक फिरत आहेत. ते घराघरातील मतदारांचा अंदाज घेऊन विरोधकांची नावे मतदार यादीतून बाद करण्याचे षडयंत्र रचत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.
"मराठी माणसाने हातात बांगड्या भरलेल्या नाहीत"
महाराज यांच्या जिरेटोपावर जैन धर्मीयांचा ध्वज लावण्याच्या प्रकरणावर बोलताना ते म्हणाले, "मराठी माणसाने हातात बांगड्या भरल्या आहेत का? आम्हाला वाद नकोत, पण जर कोणी वाद उकरून काढणार असेल, तर मनसे रस्त्यावर उतरून धाडसाने उभी राहील."