प्रतीक्षा संपणार... अखेर या तारखेला मान्सून महाराष्ट्रात धडकणार...

Share:
Main Image
Last updated: 21-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २१ जून - भीषण उकाडा आणि दमट वातावरणाने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. यंदा 'एल-निनो'च्या प्रभावामुळे रेंगाळलेला मान्सून अखेर गुरुवार, दि. २५ जून रोजी मुंबईत दाखल होण्याची दाट शक्यता आहे. मुंबईत मान्सून पोहोचण्याची सरासरी तारीख ११ जून असली, तरी यंदा तो तब्बल १४ दिवस उशिराने धडकत आहे. यापूर्वी २०१९ आणि २०२३ या 'एल-निनो'च्या वर्षांतही मान्सून २५ जून रोजीच मुंबईत दाखल झाला होता, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे (IMD) निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.

कोकणात मान्सून सक्रिय होणार; पूर्वमोसमी पावसाचा जोर

मंगळवार, दि. २३ जूनपासून मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मान्सूनसाठी अत्यंत अनुकूल वातावरण तयार होणार आहे. सध्या या भागात पूर्वमोसमी पाऊस पडत असून, मान्सून आधीच पोहोचलेल्या वेंगुर्ला, देवगड आणि हर्णाई या भागात मान्सूनच्या सरींना मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.

महत्त्वाचे अंदाज एका दृष्टीक्षेपात :

मुंबईत मुसळधार कधी?

गुरुवार दि. २५ जून ते बुधवार दि. १ जुलै दरम्यान (जूनच्या शेवटच्या आठवड्यात) मुंबईसह संपूर्ण कोकणात मान्सून अत्यंत जोरदार हजेरी लावेल.

उकाड्यापासून आजपासूनच दिलासा!

Advertisement

शनिवार, दि. २० जूनपासूनच वातावरणात बदल होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिवसा जाणवणारा दमटपणा आणि रात्रीच्या असह्य उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्यास सुरुवात होईल.

उर्वरित महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवास कसा असेल?

परिसर / विभागमान्सूनच्या आगमनाचा संभाव्य काळ

उत्तर व पश्चिम महाराष्ट्र 

(खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर व पश्चिम मराठवाडा)जूनचा शेवटचा आठवडा (मुंबईतील आगमनानंतर)

पूर्व मराठवाडा व विदर्भ जुलैचा पहिला व दुसरा आठवडा (तत्पूर्वी केवळ तुरळक ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस)

चिंता नको! मुंबईची वर्षभराची पाण्याची चिंता मिटणार

यंदा 'एल-निनो'चे वर्ष असून आजतागायत कोकणात सरासरीच्या तुलनेत तब्बल ८१% कमी पाऊस झाला आहे. असे असले तरी मुंबईकरांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. आजपासून ते साधारण २० ऑक्टोबरपर्यंतच्या मान्सूनच्या उर्वरित १३० दिवसांच्या कालावधीत मुंबई व कोकणात चांगला पाऊस होईल. या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे व तलावांचे जाळे पूर्ण क्षमतेने भरेल आणि मुंबईकरांची वर्षभराच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सुटू शकेल, असा विश्वास माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.

Advertisement

Comments

No comments yet.