पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण... कोर्टाने दिला हा निकाल... कोण दोषी? कोण निर्दोष?

Share:
Main Image
Last updated: 20-Jun-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २० जून - महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांच्या दुहेरी हत्या प्रकरणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार तथा माजी गृहराज्यमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आठ आरोपींची विशेष सीबीआय न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. ३ जून २००६ रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथे गोळ्या झाडून ही हत्या करण्यात आली होती. तब्बल २० वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल देताना, विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नवंदर यांनी तपासातील गंभीर त्रुटींवर बोट ठेवत हा ऐतिहासिक निकाल दिला.

माफीच्या साक्षीदाराने वारंवार साक्ष फिरवली

या खटल्याची संपूर्ण भिस्त सीबीआयने उभा केलेला माफीचा साक्षीदार पारसमल जैन याच्यावर होती. मात्र, न्यायमूर्तींनी निकालात त्याचे वाभाडे काढले. "खटल्याचा पायाच अत्यंत ठिसूळ आहे. मुख्य साक्षीदाराने वारंवार आपली साक्ष फिरवली असून, त्याच्या जबाबात कमालीची संदिग्धता आहे. त्यामुळे त्याची साक्ष कायद्यानुसार ग्राह्य धरता येणार नाही," असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने त्याला फितूर घोषित केले. तसेच, जैन याला १५ दिवस ताब्यात ठेवून मारहाण करून आणि औषधे बंद करून जबाब नोंदवणे अत्यंत अयोग्य होते, असे सांगत पोलिसांनी २५ दिवस बेकायदेशीर अटकेत ठेवल्याचेही कोर्टाने स्पष्ट केले.

सुनावणीदरम्यान न्यायालयात काय घडले?

रुग्णवाहिकेतून पद्मसिंह पाटील कोर्टात: मागील सुनावणीप्रमाणे आजही मुख्य आरोपी पद्मसिंह पाटील हे रुग्णवाहिकेतून व्हीलचेअरवर कोर्टात हजर झाले होते.

ओमराजे निंबाळकर यांची उपस्थिती: पवनराजे यांचे सुपुत्र आणि शिवसेना (उबाठा) पक्षाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हेदेखील कोर्टात उपस्थित होते.

मुख्य शूटरला उशीर: या खटल्यातील मुख्य शूटर पिंटू सिंग याला कोर्टात पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे आज निकाल वाचनास काहीसा विलंब झाला.

"५० हजारांसाठी हा व्यावसायिक हत्या करेल असे वाटत नाही"

Advertisement

न्यायालयाने सीबीआय आणि पोलिसांच्या तपासातील विसंगतींवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. आरोपींचे कबुलीजबाब घेताना कायद्याच्या तरतुदींचे पालन झाले नाही, प्रश्न न विचारताच संदिग्ध जबाब नोंदवले गेले. तसेच, माफीचा साक्षीदार पारसमल जैन याच्याकडे अनेक फ्लॅट्स, सोनं आणि मोठी मालमत्ता आहे. तो आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यावसायिक होता. त्यामुळे केवळ ५० हजार रुपयांच्या मोबदल्यात तो हत्येचा कट रचेल किंवा सुपारी घेईल, हा सरकारी पक्षाचा दावा पटण्याजोगा नाही, असे मत न्यायाधीशांनी नोंदवले.

२००६ ते २०२६: असा राहिला २० वर्षांचा प्रवास

३ जून २००६: नवी मुंबईच्या कळंबोलीत पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाची गोळ्या झाडून हत्या. वैयक्तिक आणि राजकीय वैमनस्यातून ३० लाखांची सुपारी देऊन ही हत्या केल्याचा आरोप.

जून २००९: उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तपास सीबीआयकडे वर्ग. सीबीआयकडून पद्मसिंह पाटील यांना अटक.

सप्टेंबर २००९: अलिबाग सत्र न्यायालयाकडून पद्मसिंह पाटील यांना जामीन मंजूर.

जुलै २०११ ते २०२६: तब्बल १५ वर्षे चाललेल्या या खटल्यात १२७ साक्षीदारांच्या साक्षी तपासल्या गेल्या. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंतही गेले होते.

हाय-प्रोफाईल राजकीय नातेसंबंधांमुळे खटला चर्चेत:

निर्दोष मुक्तता झालेले माजी गृहराज्यमंत्री पद्मसिंह पाटील हे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे मेहुणे तर सुनेत्रा पवार यांचे सख्खे बंधू आहेत. त्यांचे चिरंजीव राणाजगजितसिंह पाटील हे भाजपचे आमदार आहेत, तर दुसरीकडे पवनराजेंचे पुत्र ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरे गटाचे खासदार होते, मात्र आता ते एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले आहेत. यामुळे या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.

Advertisement

Comments

No comments yet.