नाशिक, (प्रतिनिधी) २० जून - यंदाच्या पावसावर ‘एल निनो’चा प्रभाव दिसून येत असून जून महिन्यात जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत केवळ १०.९ मिलिमीटर एवढाच पाऊस झाला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी अपुऱ्या पावसावर पेरणीची घाई करू नये, यासाठी कृषी विभागाने मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. तसेच शेतकऱ्यांना कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची माहिती देऊन त्यांचे मार्गदर्शन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय कार्यकारी समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशिद, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक भिवा लवटे यांच्यासह उपविभागीय व तालुका कृषी अधिकारी आणि कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ उपस्थित होते.
७५ ते १०० मिमी पावसाशिवाय पेरणी टाळा
जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले की, जोपर्यंत जिल्ह्यात किमान ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस होत नाही आणि जमिनीत पेरणीयोग्य ओल निर्माण होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी पूर्णपणे टाळावी. पावसाचा संभाव्य खंड लक्षात घेता आर्थिक जोखीम कमी करण्यासाठी संपूर्ण क्षेत्रात एकाच वेळी पेरणी न करता ती टप्प्या-टप्प्याने करावी. दुबार पेरणीची वेळ आल्यास शेतकऱ्यांनी घरचेच प्रमाणित सोयाबीनचे बियाणे राखीव ठेवावे.
सुरक्षित उत्पादनासाठी कृषी विभागाचे 'यशस्वी सूत्र'
मिश्र पीक पद्धती + कमी कालावधीचे वाण + पाणी साठवण + हवामानानुसार निर्णय = सुरक्षित उत्पादन
मिश्र पिके आणि गादीवाफा (BBF) पद्धतीला प्राधान्य
यंदा कमी पावसाचा अंदाज असल्याने ज्वारी, बाजरी, तूर, मूग, उडीद आणि तीळ यांसारख्या पारंपरिक व कमी पाण्यात येणाऱ्या पिकांना प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जोखीम व्यवस्थापन: तूर + सोयाबीन, बाजरी + तूर किंवा कापूस + मूग अशा मिश्र पीक पद्धतीचा अवलंब करावा.
गादीवाफा (BBF) पद्धत: जिल्ह्यातील १६०५ गावांमध्ये या तंत्रज्ञानाचा प्रसार करावा, ज्यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो.
पाणी नियोजन: बाष्पीभवन रोखण्यासाठी मल्चिंग करावे. ठिबक व तुषार सिंचनाचा वापर करून शेततळ्यांमध्ये 'संरक्षित सिंचन साठा' राखून ठेवावा. फळबागा वाचवण्यासाठी कृषी विभागाने विशेष मोहीम राबवावी.
'महाविस्तार एआय' ॲप आणि 'ॲग्रीस्टॅक' नोंदणी
शेतकऱ्यांनी हवामान अंदाज आणि आपल्या शंकांचे निरसन करण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकृत 'महाविस्तार एआय' ॲपचा आणि डिजिटल शेतीशाळेचा वापर करावा, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत ८४ टक्के (६,५५,८७९) शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक अंतर्गत नोंदणी झाली असून उर्वरित खातेदारांची नोंदणी गतिमान करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच शेतकऱ्यांचे ई-केवायसी (e-KYC) आणि आधार लिंकिंग तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. खरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत तांत्रिक अडचणींमुळे प्रलंबित असलेली विमा नुकसान भरपाई त्वरित देण्याचे निर्देश विमा कंपन्या व स्कायमेटला देण्यात आले आहेत.
खते आणि बियाण्यांचा मुबलक साठा
जिल्ह्यात सध्या युरियाचा ४२,००८ टन आणि डीएपी (DAP) चा १३,३९८ टन साठा उपलब्ध असून वितरण सुरळीत सुरू आहे. बियाणे व खतांचा काळाबाजार किंवा गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथके तैनात करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली.