मुंबई, (विशेष प्रतिनिधी) १८ जून - संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) घोषित केलेला २३ जून हा ‘आंतरराष्ट्रीय विधवा दिन’ आता महाराष्ट्रातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि ग्रामपंचायतींमध्ये ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी गावातील आणि शहरातील सर्व एकल महिलांना सन्मानाने कार्यक्रमाला निमंत्रित करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. तसेच, समाजात एकल महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतींनी विशेष ठराव मंजूर करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्य शासनामार्फत सध्या 'एकल महिला धोरण' तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एकल महिलांच्या समस्या, त्यांच्या अपेक्षा आणि आवश्यक उपाययोजनांबाबत मंत्रालयात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त माधवी सरदेशमुख यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अपमानास्पद रूढी-परंपरांना बसणार आळा!
बैठकीत बोलताना मंत्री आदिती तटकरे यांनी स्थानिक प्रशासनाला कडक निर्देश दिले:
सन्मानजनक संज्ञा : राज्यात यापुढे ‘विधवा’ या शब्दाऐवजी अत्यंत सन्मानजनक अशी ‘एकल महिला’ ही संज्ञा वापरली जाईल.
ग्रामपंचायतींमध्ये ठराव : गाव किंवा शहरांमध्ये एकल महिलांना जुन्या रूढी-परंपरांच्या आधारावर कोणतीही अपमानास्पद वागणूक दिली जाणार नाही, याची खात्री करण्यासाठी ग्रामसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपापल्या क्षेत्रात ठराव मंजूर करावेत.
धोरणासाठी सूचना : २३ जून रोजी होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये राज्य शासनाच्या प्रस्तावित 'एकल महिला धोरणा'बाबत महिलांची मते, सूचना आणि अपेक्षा जाणून घेऊन त्या शासनाकडे पाठवल्या जाव्यात.
सरकारी योजनांचा लाभ थेट महिलांपर्यंत पोहोचवणार
स्थानिक प्रशासनाने पुढाकार घेऊन एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय अडचणी जाणून घ्याव्यात आणि त्यांचे जागेवरच निराकरण करण्याचा प्रयत्न करावा. तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचवावा, असे आवाहन मंत्र्यांनी केले.
'एकल महिला दिवसा'च्या कार्यक्रमाचे स्वरूप कसे असेल?
क्रांतिसूर्यांना अभिवादन : महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून, त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या ऐतिहासिक कार्याची माहिती दिली जाईल.
रोजगार संधींवर चर्चा : महिलांच्या रोजगार, स्वयंरोजगार आणि उपजीविकेच्या साधनांबाबत विशेष मार्गदर्शन केले जाईल.
बचत गटांत समावेश : ज्या एकल महिला अजूनही कोणत्याही बचत गटात समाविष्ट झालेल्या नाहीत, त्यांना बचत गटांशी जोडण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल.
"या महत्त्वाच्या उपक्रमामुळे समाजात एकल महिलांना सन्मानपूर्वक आणि समानतेची वागणूक मिळण्यासाठी मोठी जनजागृती होईल. तसेच त्यांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणाला गती मिळेल."
– आदिती तटकरे, महिला व बालविकास मंत्री.