नांदगाव, (प्रतिनिधी) १७ जून - नांदगाव नगरपालिकेच्या मालकीच्या शाळेत शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांना कोणतीही पूर्वकल्पना किंवा कारण न देता अचानक कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ आज एका रणरागिणीने थेट विष प्राशन करून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. संगिता सोनवणे असे विष प्राशन केलेल्या शिवकन्येचे नाव असून, या धक्कादायक घटनेमुळे नांदगाव शहरासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. शासकीय यंत्रणा आणि शिक्षण विभाग राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप करत महिलांनी प्रशासनाच्या निर्लज्ज कारभाराचा तीव्र निषेध केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ संताप अनावर
कामावरून बेकायदेशीरपणे कमी केल्याच्या निषेधार्थ संगिता सोनवणे यांनी आज आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज शहरातील शिवस्फूर्ती मैदानावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बाधित महिला कर्मचारी एकत्र जमल्या होत्या. यावेळी मुख्यधिकारी, गटविकास अधिकारी (BDO) आणि शिक्षण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी महिलांची समजूत काढण्याऐवजी अत्यंत उडवाउडवीची उत्तरे दिली. "आमच्या हातात काही नाही, आम्ही आता चौकशी समिती नेमू आणि मग काय तो निर्णय घेऊ," असे बेजबाबदार उत्तर अधिकाऱ्यांनी देताच महिलांचा संताप अनावर झाला. याच संतापातून संगिता सोनवणे यांनी सर्वांसमोर विष प्राशन केले.
रुग्णवाहिकाही मिळेना; पोलिसांच्या गाडीतून रुग्णालयात धाव
विष प्राशन केल्यानंतर संगिता सोनवणे यांची प्रकृती खालावू लागली. अत्यंत संतापजनक बाब म्हणजे अशा आणीबाणीच्या प्रसंगी घटनास्थळी रुग्णवाहिका (Ambulance) देखील उपलब्ध नव्हती. अखेर उपस्थित महिला कर्मचारी आणि पोलिसांनी तत्परता दाखवत सोनवणे यांना तातडीने पोलिसांच्याच गाडीत टाकून शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने मालेगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे दाद मागूनही दुर्लक्ष; महिलांचा आरोप
"पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा आमच्या पोटापाण्याच्या प्रश्नाला केवळ 'मजाक' समजत आहे," असा संतप्त आरोप आंदोलनकर्त्या महिलांनी केला आहे. या अन्यायाविरुद्ध महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह सर्व संबंधित मंत्रालयांना लेखी पत्र देऊन दाद मागितली होती. मात्र, सत्ताधारी आणि प्रशासकीय पातळीवर या गरीब महिलांच्या आक्रोशाची दखल घेतली गेली नाही, म्हणूनच आज आमच्या भगिनीवर ही वेळ आल्याची भावना महिलांनी व्यक्त केली. कोणत्याही चुकीशिवाय केवळ राजकीय दबावापोटी महिलांना बेरोजगार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.