ठाकरेंना दणका आणि ‘ऑपरेशन टायगर’मागे नक्की कुणाचा हात? भाजपने स्पष्टच सांगून टाकलं...

Share:
Main Image
Last updated: 17-Jun-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १७ जून - "तथाकथित 'ऑपरेशन टायगर'शी भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेचा (शिंदे गट) दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही. हे ऑपरेशन म्हणजे केवळ 'उबाठा' (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील अंतर्गत शीतयुद्ध आणि वादाचा परिणाम आहे. संजय राऊत ज्या खालच्या पातळीची भाषा वापरतात, त्यामुळेच त्यांच्यावर ही वेळ आली आहे," अशा घणाघाती शब्दांत भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी आज खासदार संजय राऊत यांची खरडपट्टी काढली. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राऊत यांच्या विधानांचा खरपूस समाचार घेतला.

"महाराष्ट्रात तुमची दादागिरी सहन केली जाणार नाही"

संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल करताना नवनाथ बन म्हणाले, "तुम्हाला तुमचे खासदार आणि तुमचे विचार सोबत ठेवता येत नसल्यानेच उबाठा गटाची आज ही दैना झाली आहे. हा काही बांगलादेश किंवा पाकिस्तान नाही. तुमची दादागिरी इथे अजिबात सहन केली जाणार नाही. तुम्ही कोणाला धमकावत असाल, तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल."

राऊत यांच्या वक्तृत्वावर टीका करताना ते पुढे म्हणाले, "संजय राऊत यांना कमरेखालचे आणि अश्लील शब्द वापरून लोकांना शिव्या देण्याची सवय लागली आहे. त्यांच्या या भाषेचा महाराष्ट्रातील जनतेला वीट आला आहे."

"आई-बाबा अन् साईबाबांची शपथ घेऊन पक्ष वाढत नाही"

Advertisement

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या राजकीय भूमिकेवर निशाणा साधताना बन म्हणाले, "आई-बाबा आणि साईबाबांची शपथ घेऊन माणसे टिकवता येत नाहीत आणि पक्षही वाढवता येत नाही. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांवर जर निष्ठा ठेवली असती, तर आज ही वेळ आली नसती. तुम्ही स्वतःच्या वडिलांचे विचार सोडले आणि काँग्रेसच्या दावणीला जाऊन बसलात, म्हणूनच लोक तुम्हाला सोडून जात आहेत. मुळात 'टायगर' कोण आणि 'शेळी' कोण, हे महाराष्ट्राच्या जनतेने कधीच दाखवून दिले आहे."

"राऊत हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मतांवर खासदार"

संजय राऊत यांच्या खासदारकीवर बोट ठेवत नवनाथ बन यांनी त्यांना थेट राजीनामा देण्याचे आव्हान दिले.

"संजय राऊत हे स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मतांच्या जोरावर राज्यसभेवर निवडून आले आहेत. जर त्यांनी मतदान केले नसते, तर राऊत खासदार झाले नसते," असे बन यांनी स्पष्ट केले.

"राऊतांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी जाहीर करावे की, मी एकनाथ शिंदेंची मते नाकारतो आणि त्यांच्या जीवावर मिळालेल्या खासदारकीच्या तोंडावर राजीनामा फेकतो! स्वतः मूळ आमदार-खासदार आणि मुख्यमंत्र्यांच्या मतांवर निवडून यायचे आणि वर तोंड करून इतरांचे राजीनामे मागितचे, हा राऊत यांचा दुटप्पीपणा आहे. जोपर्यंत ते राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत त्यांना इतरांचे राजीनामे मागण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही," अशी चपराकही बन यांनी शेवटी लगावली.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.