मान्सून नक्की कुठे आणि का अडकला? मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात कधी येणार?

Share:
Main Image
Last updated: 16-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १६ जून - गेल्या आठवड्यापासून कोकणच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेला मान्सून अनुकूल वातावरणाअभावी जागच्या जागीच खिळला आहे. महाराष्ट्रात मान्सून पुढे सरकण्यासाठी आणखी किमान आठवडाभराचा कालावधी लागण्याची शक्यता असून, २३ जूननंतरच वातावरणात बदल होऊन पाऊस सक्रिय होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाचे (IMD) निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यातच (२५ जून ते १ जुलै दरम्यान) मुंबईसह संपूर्ण राज्यात मान्सूनचा चांगला पाऊस हजेरी लावेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मान्सून नक्की कुठे आणि का अडकला?

सोमवार, ८ जून रोजी मान्सून तळकोकणातील हर्णाई ते सोलापूरपर्यंत पोहचला होता. मात्र, त्यानंतर त्याची प्रगती पूर्णपणे थांबली आहे. या खोळंब्यामागे प्रामुख्याने दोन कारणे आहेत:

१. वायव्येकडून येणारे अत्यंत उष्ण वारे.

२. अरबी समुद्रात ३.५ ते ३.७५ किमी उंचीवर असलेली प्रत्यावर्ती वाऱ्याची प्रणाली आणि कमकुवत झालेले मान्सूनी वारे. यामुळे मान्सूनच्या वाटचालीत मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात कधी येणार?

२३ जून: वातावरणात बदल होऊन मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता.

२५ जून ते १ जुलै (वटपौर्णिमा-एकादशीचा आठवडा): या काळात मुंबईसह संपूर्ण कोकणात मान्सूनचा दमदार पाऊस पडेल. मुंबईत मान्सून चांगल्या प्रकारे स्थिरावल्यानंतर तो सह्याद्री ओलांडून मध्य महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात प्रवेश करेल.

Advertisement

विदर्भ आणि मराठवाड्याची स्थिती काय?

बंगालच्या उपसागरातून येणारी मान्सूनची दुसरी शाखा पूरक प्रणाली अभावी सध्या संथ झाली आहे. त्यामुळे विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यातील पाऊस या शाखेच्या प्रगतीवर अवलंबून असेल. ही शाखा देखील २५ जून ते १ जुलै दरम्यान सक्रिय होऊन या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुढील ४ दिवस काळजी घ्या: २९ जिल्ह्यांत उष्णतेची लाट!

पाऊस लांबल्यामुळे राज्यात सध्या उन्हाचा चटका आणि उकाडा वाढणार आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ: आजपासून ते शुक्रवार, १९ जून दरम्यान येथील २९ जिल्ह्यांमध्ये भाग बदलत तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थिती राहील.

कोकण: कोकणातील ७ जिल्ह्यांमध्ये हवामान कमालीचे उष्ण आणि दमट राहील, तसेच रात्रीचा उकाडा असह्य होईल.

शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई करू नका!

प्रशांत महासागरातून येणाऱ्या मान्सून वाऱ्यांना 'एल-निनो' प्रभावामुळे काहीसा अडथळा निर्माण होत आहे. वाऱ्यांमध्ये पुरेसा जोर नसल्यामुळे दमदार पाऊस आणि पेरणीयोग्य ओलीसाठी शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे. २५ जूननंतरच्या पावसानंतर, म्हणजेच १ जुलै नंतरच परिस्थिती पाहून पेरणीबाबत निश्चित सांगता येईल, असे माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईघाईत पेरण्या करू नयेत, असे आवाहन केले जात आहे.

अधिक माहितीसाठी माणिकराव खुळे 94232 17495 यांच्याशी संपर्क साधावा

Advertisement

Comments

No comments yet.