नाशिक, (प्रतिनिधी) १६ जून - बनावट कागदपत्रे आणि गुंडगिरीच्या जोरावर वडाळा गावातील एका मोक्याच्या ठिकाणचा भूखंड (प्लॉट) बळकावण्याचा स्थानिक भूमाफियांचा प्रयत्न इंदिरानगर पोलिसांनी यशस्वीपणे उधळून लावला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या कडक आदेशान्वये पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत ही धडक कारवाई केली. "नाशिक शहरात कोणत्याही प्रकारे भूखंड बळकावण्याचे, बनावट कागदपत्रांचे किंवा दादागिरीचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत," असा सज्जड इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
वारसांच्या जागेवर रात्रीतून लावला फलक
महात्मानगर येथील रहिवासी राहुल वसंत वैद्य यांच्या मालकीचा वडाळा शिवारात एक मोक्याचा भूखंड आहे. त्यांच्या आई शैलजा वैद्य यांच्या निधनानंतर राहुल वैद्य आणि त्यांची बहीण हे या जागेचे कायदेशीर वारसदार आहेत. या जागेवर पक्के सिमेंटचे कंपाऊंडही बांधलेले आहे. मात्र, स्थानिक काही गुंडांचा या जागेवर पूर्वीपासूनच डोळा होता. संशयित टोळक्याने मध्यरात्रीच्या सुमारास या जागेवर 'ही जागा आमच्या मालकीची आहे' असा जाहीर इशारा देणारा फलक (बोर्ड) बेकायदेशीरपणे उभा केला.
जीवे मारण्याची धमकी आणि वकिलांची मदत
या प्रकाराला मूळ मालक राहुल वैद्य यांनी विरोध केला असता, संशयित टोळक्याने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला थेट जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या वैद्य यांनी तातडीने अॅड. सुयोग शहा यांची भेट घेऊन सर्व आपबिती कथन केली. अॅड. शहा यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने सर्व डिजिटल पुरावे गोळा केले आणि पोलीस आयुक्त तसेच इंदिरानगर पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली.
आयुक्तांची तत्परता; पोलीस पथक घटनास्थळी
तक्रार मिळताच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले. पोलिसांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत प्लॉटवर लावलेला तो वादग्रस्त फलक जप्त केला. तसेच संबंधित संशयितांना पोलीस ठाण्यात पाचारण करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे.
नाशिकमध्ये भूमाफियांविरोधात पोलिसांची मोहीम तीव्र
नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून जमिनी बळकावणाऱ्या टोळ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांपूर्वीच दोन वकिलांसह १४ संशयितांवर बोगस कागदपत्रांच्या आधारे दोन वेगवेगळे प्लॉट बळकावल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या ताज्या कारवाईमुळे नाशिकमधील भूमाफियांचे धाबे दणाणले असून नागरिकांमधून पोलिसांच्या या तत्परतेचे स्वागत होत आहे.