पुणे, (प्रतिनिधी) १५ जून - भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या 'मेरा युवा भारत' (MY Bharat) संस्थेच्या वतीने नवी दिल्ली येथे १५ ते १७ जून २०२६ या कालावधीत 'विकसित भारत युवा संसद २०२६' चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय स्तरावरील संसदेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान पुण्याच्या चैतन्य गर्जे याने मिळवला आहे. चैतन्यच्या या यशामुळे पुणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, संपूर्ण राज्यातून त्याचे अभिनंदन होत आहे. पुण्याचे जिल्हा युवा अधिकारी आशिष शेटे यांनी या संदर्भात माहिती दिली. देशभरात तीन टप्प्यांत पार पडलेल्या या स्पर्धेच्या जिल्हा आणि राज्यस्तरीय फेऱ्यांनंतर राष्ट्रीय फेरीसाठी अंतिम प्रतिनिधींची निवड करण्यात आली. यामध्ये चैतन्य गर्जे याने महाराष्ट्र राज्यस्तरीय फेरीत द्वितीय क्रमांक पटकावत राष्ट्रीय अधिवेशनाचा तिकीट मिळवले. केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या नेतृत्वाखाली हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविला जात आहे.
संसद भवनाच्या केंद्रीय सभागृहात रंगणार सोहळा
येत्या १६ जून २०२६ रोजी नवी दिल्लीतील संसद भवनाच्या ऐतिहासिक केंद्रीय सभागृहात (Central Hall) लोकसभेचे माननीय अध्यक्ष श्री. ओम बिर्ला यांच्या हस्ते या युवा संसदेचे अधिकृत उद्घाटन होणार आहे. या प्रसंगी केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
'नारी शक्ती' वर होणार घमासान चर्चा
या राष्ट्रीय फेरीत देशभरातून आलेले तरुण खासदार बनून "नारी शक्ती वंदन : सर्वसमावेशकता आणि विकसित भारत २०४७" या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर संसदीय पद्धतीने चर्चा करणार आहेत. यामध्ये प्रश्नोत्तर तास, वक्तृत्व आणि सार्वजनिक संवादकौशल्यावरील विशेष मास्टरक्लासचेही आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय युवा प्रतिनिधींना 'पंतप्रधान संग्रहालय' आणि देशाच्या 'नवीन संसद भवनाला' भेट देण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
युवकांचा लोकशाहीतील सहभाग वाढवणारा उपक्रम
'विकसित भारत युवा संसद' हा केवळ एक स्पर्धात्मक कार्यक्रम नसून, देशाच्या लोकशाही प्रक्रियेत तरुण पिढीचा सक्रिय सहभाग वाढविणारा आणि 'विकसित भारत २०४७' च्या संकल्पनेला बळकटी देणारा एक दूरगामी उपक्रम आहे.
चैतन्य गर्जे याने मिळवलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल पुणे जिल्ह्यातील युवक, शैक्षणिक क्षेत्र, सामाजिक संस्था तसेच 'मेरा युवा भारत, पुणे' परिवाराकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, राष्ट्रीय स्तरावरील त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.