पंढरपूर, (प्रतिनिधी) १४ जून - एक अत्यंत थरारक आणि हृदयद्रावक अपघाताची बातमी समोर आली आहे. म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदूळवाडी गावाजवळ भाविकांनी भरलेला टेम्पो थेट रस्त्या कडेला असलेल्या उघड्या विहिरीत कोसळला. या भीषण अपघातात तब्बल १४ जणांचा जागीच मृत्यू झाला असून, मृतांमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचा समावेश आहे. हे सर्व मृत भाविक पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे रहिवासी आहेत. या घटनेमुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे.
दर्शन घेऊन गावी परतताना घडला अनर्थ
मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूरच्या रांजणी गावातील एक गट सिद्धनाथांच्या दर्शनासाठी गेला होता. यामध्ये एकाच कुटुंबातील आणि नात्यातील सदस्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. सिद्धनाथांचे मनोभावे दर्शन घेऊन हा ग्रुप टेम्पोने आनंदाने आपल्या गावाकडे परतत होता. मात्र, माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गावानजीक चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भाविकांचा टेम्पो थेट रस्त्याशेजारील विहिरीत कोसळला आणि क्षणात आनंदाचे रूपांतर अक्राळविक्राळ आक्रोशात झाले.
गावकऱ्यांची मदतीसाठी धाव, प्रशासनाकडून मृतदेह बाहेर काढण्याचे काम
अपघाताचा मोठा आवाज होताच तांदूळवाडी येथील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. गावकऱ्यांनी तत्परता दाखवत पोलिसांना माहिती दिली आणि स्वतः विहिरीत उतरून मदतकार्य सुरू केले. माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. गावकरी आणि प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांनी विहिरीतून १४ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ते शवविच्छेदनासाठी तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मृतांची अधिकृत नावे अद्याप प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली नाहीत.
नाशिकच्या 'दिंडोरी' अपघाताची पुनरावृत्ती; उघड्या विहिरींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
तांदूळवाडीत घडलेल्या या भीषण अपघाताने काही दिवसांपूर्वी नाशिकच्या दिंडोरी भागात घडलेल्या विहीर अपघाताच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. या अपघातामुळे राज्यातील महामार्ग आणि मुख्य रस्त्यांच्या कडेला असलेल्या उघड्या विहिरींचा व त्यांना संरक्षक कठडे नसण्याचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याने जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रांजणी गावावर दुःखाचा डोंगर
अपघातात मृत्यू झालेले सर्व १४ भाविक हे पंढरपूरच्या रांजणी गावचे असल्याने या दुर्घटनेची बातमी गावात पोहोचताच संपूर्ण रांजणी गावावर शोककळा पसरली आहे. एकाच गावातील आणि एकाच कुटुंबातील एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक दगावल्याने गावात सध्या चूलही पेटलेली नाही. सर्वत्र रडारड आणि शांतता पसरली असून संपूर्ण पंढरपूर तालुका या घटनेने हादरला आहे. पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.