'मातोश्री'वरील बैठकीला किती खासदार हजर होते? संजय राऊतांनी खरं खरं सांगून टाकलं...

Share:
Main Image
Last updated: 14-Jun-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १४ जून - पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षात उभी फूट पडल्याची आणि २० खासदारांच्या एका गटाने स्वतंत्र गट स्थापन केल्याची बातमी ताजी असतानाच, महाराष्ट्रातील राजकीय वातावरणही तापले आहे. ठाकरे गटाचे (शिवसेना उबाठा) खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तातडीने 'मातोश्री' निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीला केवळ ४ खासदार प्रत्यक्ष हजर राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावत सर्व नऊ खासदार बैठकीला उपस्थित होते, असा दावा केला आहे.

 ४ प्रत्यक्ष तर ५ खासदार ऑनलाईन; राऊतांनी दिली नावे

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, शिवसेना (उबाठा) पक्षाचे सर्वच्या सर्व नऊ खासदार या बैठकीला उपस्थित होते. मुंबईतील खासदार वगळता मराठवाडा आणि विदर्भातील खासदारांची प्रत्यक्ष अनुपस्थिती दिसून आली असली, तरी तांत्रिक किंवा कौटुंबिक कारणांमुळे ते ऑनलाईन जोडले गेले होते.

प्रत्यक्षात उपस्थित असलेले खासदार:

अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय दीना पाटील आणि राजाभाऊ वाजे.

ऑनलाईन उपस्थित राहिलेले खासदार व त्यांची कारणे:

नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली): त्यांचा मुलगा विधानपरिषदेची निवडणूक लढवत असल्याने ते मतदारसंघात व्यस्त होते.

संजय देशमुख (यवतमाळ): त्यांच्या घरी मुलीचे लग्न कार्य असल्याने ते प्रत्यक्ष येऊ शकले नाहीत.

Advertisement

संजय जाधव (परभणी): हे फोनवरून बैठकीत सहभागी झाले होते.

भाऊसाहेब वाकचौरे आणि ओमराजे निंबाळकर: कौटुंबिक आणि वैद्यकीय (मेडिकल) कारणास्तव ते ऑनलाईन उपस्थित होते.

"आम्ही दर महिन्याला अशी रूटीन मिटिंग करत असतो, ज्यात उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतात. आज जे प्रत्यक्ष येऊ शकले नाहीत, ते येत्या दोन-तीन दिवसांत स्वतः 'मातोश्री'वर येऊन पक्षप्रमुखांची भेट घेतील," असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेत तथ्य नाही – आमदार कैलास पाटील

ठाकरे गटाचे खासदार फुटणार आणि 'ऑपरेशन टायगर' राबवले जाणार, या चर्चांवर उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

"ऑपरेशन टायगरच्या चर्चेत काहीही तथ्य नाही. लोकसभा निवडणुकीपासून अशा कंड्या कायम पिकवल्या जातात. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मुलाची तब्येत बरी नसल्याने ते प्रत्यक्ष हजर राहू शकले नाहीत आणि त्यांनी तशी पूर्वकल्पना पक्षाला दिली होती. अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीलाही ते याच कारणाने अनुपस्थित होते. आम्ही २०२२ मध्येच आमची भूमिका स्पष्ट केली आहे की, काहीही झाले तरी उद्धव ठाकरेंसोबतच ठाम राहायचे."

– कैलास पाटील, आमदार (शिवसेना उबाठा)

या बैठकीमुळे आणि खासदारांच्या ऑनलाईन उपस्थितीमुळे विरोधकांना जरी टीका करण्याची संधी मिळाली असली, तरी पक्षांतर्गत सर्व काही अलबेल असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून केला जात आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.