मुंबई, (प्रतिनिधी) १२ जून - राज्यात सध्या सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर ‘कृषी मित्र’ भरतीच्या नावाखाली काही टोळ्यांकडून बोगस जाहिराती प्रसारित केल्या जात आहेत. या माध्यमातून शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक व सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करून फसवणूक करण्याचा प्रयत्न होत असल्याचे समोर आले आहे. अशा कोणत्याही खोट्या जाहिरातींवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये आणि फसवणुकीला बळी पडू नये, असे जाहीर आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.
फसवणूक करणाऱ्यांवर होणार फौजदारी गुन्हे!
यासंदर्भात कडक भूमिका घेत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, "कृषी मित्र भरतीच्या नावाखाली शेतकरी आणि युवकांची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. खोट्या व दिशाभूल करणाऱ्या जाहिराती पसरवणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांवर कृषी विभागामार्फत थेट फौजदारी गुन्हे (Criminal Cases) दाखल करण्याची कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे. नागरिकांनी अधिकृत माहितीशिवाय कुठेही पैसे भरू नयेत."
नागरिकांनी 'या' गोष्टींची काळजी घ्यावी:
बँक खात्यावर पैसे पाठवू नका: सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या जाहिरातींमध्ये अर्जासाठी शुल्क भरणे किंवा वैयक्तिक बँक खात्यावर पैसे जमा करण्याचे आवाहन केले असल्यास त्याला अजिबात दाद देऊ नका.
संशयास्पद लिंक्स टाळा: व्हाट्सॲप किंवा इतर सोशल मीडियावर येणाऱ्या अनधिकृत लिंक्सवर क्लिक करून आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नका.
अधिकृत खातरजमा करा: कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही खऱ्या भरती प्रक्रियेची माहिती केवळ शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर (Official Website) किंवा प्रसिद्धी माध्यमांद्वारेच जाहीर केली जाते.
संशयास्पद प्रकार आढळल्यास इथे संपर्क करा:
कृषी विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, जर तुम्हाला अशी कोणतीही संशयास्पद जाहिरात, मेसेज किंवा पैशांची मागणी करणारा फोन आल्यास, त्याची माहिती तात्काळ जवळच्या कृषी विभाग कार्यालयाला किंवा स्थानिक पोलीस प्रशासनाला द्यावी, जेणेकरून अशा भामट्यांवर तातडीने कारवाई करता येईल.