मुंबई, (प्रतिनिधी) ११ जून - लोक एकदा संधी देतात त्या संधीचे सोने करायचे की माती करायची हे आपल्या हातात असते. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने जनतेत जाऊन संघर्ष करत पक्षबांधणीला नवी ऊर्जा द्यावी असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
पक्ष स्थापनेच्या आठवणींना उजाळा देताना भुजबळ यांनी सांगितले की, १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात सामान्य माणसाच्या हक्कासाठी लढणाऱ्या नव्या विचारांची चळवळ सुरू झाली. पक्षाचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याचा अभिमान व्यक्त करत त्यांनी महाराष्ट्रभर फिरून संघटना उभारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला. राष्ट्रवादी काँग्रेस हा सामाजिक न्याय, पुरोगामी विचार, धर्मनिरपेक्षता आणि विकासाच्या मूल्यांवर उभा असलेला पक्ष असल्याचे सांगत त्यांनी पक्षाच्या वाढीत माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ आणि हजारो कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.
आपल्या भाषणात पक्षाच्या २७ वर्षांच्या संघर्षमय प्रवासा बद्दल बोलताना "सफर मुश्किल था मगर हौसलों ने साथ निभाया, हर तूफान से लड़कर हमने कारवाँ बनाया।
ये विरासत यूँ ही नहीं मिली साथियों, कई लोगों ने अपना सब कुछ दांव पर लगाया॥"
या शयरीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचा आजचा विस्तार हा अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या त्याग, संघर्ष व समर्पणातून घडला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
स्वर्गीय अजितदादांच्या योगदानाचे स्मरण करताना छगन भुजबळ म्हणाले की, त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. मात्र त्यांनी दिलेला विचार आणि उभी केलेली कार्यकर्त्यांची फळी आजही पक्षाला प्रेरणा देत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार यांनी संकटाच्या काळात संयम आणि धैर्याने पक्षाची धुरा सांभाळल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पक्षाचा वर्धापन दिन हा आत्मपरीक्षणाचा दिवस असल्याचे सांगत भुजबळ यांनी प्रत्येक पदाधिकाऱ्याने पक्षाचा विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविणे, समाजातील शेवटच्या घटकासाठी काम करणे आणि पक्ष मजबूत करण्यासाठी योगदान देणे आवश्यक असल्याचे सांगितले. युवक, महिला, शेतकरी, कामगार आणि विद्यार्थ्यांना पक्षाशी जोडण्याबरोबरच सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
बेरोजगारी, शेती, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक समतेच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक ताकदीने काम करावे लागेल, असे मत व्यक्त करत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.
"पद हे क्षणिक असते, पण विचार अमर असतात. संघर्ष हा आपला वारसा आहे, समर्पण ही आपली ओळख आहे आणि जनतेचा विश्वास हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे," असे सांगत भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वसामान्य जनतेचा अधिक विश्वासार्ह पक्ष बनविण्यासाठी नव्या जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले.