मुंबई, (विशेष प्रतिनिधी) ११ जून - स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' ही ऐतिहासिक आणि वैचारिक मालिका टीआरपीअभावी (TRP) बंद करण्याच्या वाहिनीच्या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मात्र, महापुरुषांचा हा पुरोगामी विचार आणि इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचत राहावा, यासाठी आता संपूर्ण महाराष्ट्र या मालिकेच्या पाठीशी उभा राहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी ५० लाख रुपयांची मदत जाहीर केल्यानंतर, आता अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनेही या मालिकेसाठी २५ लाख रुपयांचे विशेष आर्थिक सहकार्य जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या मालिकेला आता एकूण ७५ लाख रुपयांचे मोठे बळ मिळाले आहे.
महात्मा फुलेंच्या द्विशताब्दी जन्मवर्षानिमित्त समता परिषदेचा पुढाकार
यंदाचे वर्ष क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांचे द्विशताब्दी जन्मवर्ष असल्याने राज्यभरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून विचार जागर केला जात आहे. या पार्श्वभूमीवर समता परिषदेने हे मोठे पाऊल उचलले आहे.
समता परिषदेच्या वतीने सांगण्यात आले की, "महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण, सामाजिक समता आणि स्त्री सक्षमीकरणासाठी केलेले ऐतिहासिक कार्य खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि त्यांची संपूर्ण टीम या मालिकेतून अतिशय प्रभावीपणे पोहोचवत आहे. हा वारसा जनमानसापर्यंत अविरत पोहोचत राहावा, हाच या २५ लाख रुपयांच्या मदतीचा मुख्य उद्देश आहे. महापुरुषांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान देऊन या मालिकेला पाठबळ द्यावे."
राज्यभरात फिरतोय 'भिडेवाडा' चित्ररथ
स्त्री शिक्षणाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने पुणे येथील ऐतिहासिक 'भिडेवाडा' (देशातील पहिली मुलींची शाळा) या वास्तूचा एक अतिशय देखणा आणि हुबेहूब चित्ररथ साकारला आहे. हा चित्ररथ सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवास करत असून, स्त्री शिक्षणाचा आणि समतेच्या मूल्यांचा जागर करत आहे. महापुरुषांच्या विचारांचा हा प्रकाश घराघरात पोहोचवण्यासाठी समता परिषद सदैव कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
"व्यावसायिक गणितांपेक्षा विचार महत्त्वाचा!" : रोहित पवार
यापूर्वी, केवळ व्यावसायिक गणिते आणि कमी टीआरपीचे कारण पुढे करत वाहिनीने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यात डॉ. अमोल कोल्हे हे स्वतः ज्योतिराव फुलेंच्या मुख्य भूमिकेत आहेत. या निर्णयावर तीव्र आक्षेप घेत आमदार रोहित पवार यांनी सर्वात आधी मदतीचा हात पुढे केला होता. "सावित्रीबाई फुले या मालिकेसाठी माझ्या कंपनीकडून ५० लाख रुपये दिले जातील. शेवटी व्यावसायिक गणितांपेक्षा विचार महत्त्वाचा आहे आणि तो टिकला पाहिजे," अशी ठाम भूमिका रोहित पवारांनी मांडली होती. आता त्यात समता परिषदेच्या २५ लाखांची भर पडल्याने ही मालिका सुरू राहण्याचा मार्ग सुकर झाला आहे.