मुंबई, (विशेष प्रतिनिधी) ११ जून - महाराष्ट्र सरकारच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या खासगी विमानात ९ जून रोजी संध्याकाळी अचानक तांत्रिक बिघाड झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. मुंबईहून दिल्लीला जात असताना उड्डाणापूर्वीच हा प्रकार वैमानिकाच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, या बिघाडामुळे मुंबई विमानतळावर काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
ऐन उड्डाणाच्या वेळीच बिघाड
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जून रोजी संध्याकाळी ५ वाजता सुनेत्रा पवार यांचे खासगी विमान मुंबईहून दिल्लीसाठी उड्डाण करणार होते. मात्र, ऐनवेळी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकाच्या निदर्शनास आले. सुरक्षेचा उपाय म्हणून विमान तब्बल २ तास मुंबई विमानतळावरच थांबवून ठेवण्यात आले. अखेर सर्व तांत्रिक बाबी तपासून आणि आवश्यक ती दुरुस्ती केल्यानंतर, संध्याकाळी ५ चे हे विमान दोन तास उशिराने म्हणजेच रात्री ७ वाजता दिल्लीसाठी सुरक्षितपणे रवाना झाले.
महायुतीचे दिग्गज नेतेही होते सोबत
विशेष म्हणजे या विमानामध्ये सुनेत्रा पवार यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र पार्थ पवार, खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल हे महायुतीचे दिग्गज नेतेही प्रवास करत होते. हे सर्व नेते दिल्लीतील एका महत्त्वाच्या राजकीय बैठकीसाठी रवाना होत असताना हा प्रकार घडला.
पुन्हा 'व्हीएसआर' कंपनीचे विमान चर्चेत
मिळालेल्या माहितीनुसार, बिघाड झालेले खाजगी विमान हे 'व्हीएसआर' (VSR) कंपनीचे होते. तांत्रिक बिघाड दुरुस्त केल्यानंतर सर्व नेत्यांनी याच विमानाने आपला पुढील प्रवास पूर्ण केला. सर्व प्रवासी नेते सुरक्षितपणे दिल्लीला पोहोचल्याने प्रशासनाने आणि कार्यकर्त्यांनी सुटकेचा श्वास सोडला असला, तरी या घटनेमुळे 'व्हीएसआर' कंपनी पुन्हा एकदा वादाच्या भोवर्यात सापडली आहे.
रोहित पवारांच्या आरोपांमुळे जुन्या आठवणींना उजाळा
उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचे विमान अपघातात बारामतीमध्ये निधन झाले होते, ते विमानही याच 'व्हीएसआर' कंपनीचे होते. या दुर्घटनेनंतर राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी विमानाच्या दर्जावरून गंभीर आरोप केले होते. अजित पवारांचा मृत्यू हा घातपात होता का? अशी शंका उपस्थित करत रोहित पवारांनी या कंपनीवर कारवाईची मागणी केली होती. या विमान कंपनीच्या मालकाचे संबंध एका बड्या राजकीय नेत्याशी असल्यामुळेच कारवाई होत नसल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी केला होता. आता सुनेत्रा पवारांच्या विमानातील बिघाडामुळे या जुन्या वादाला पुन्हा तोंड फुटण्याची शक्यता आहे.