लाच प्रकरणात खळबळजनक वळण... तहसीलदार चव्हाण यांना जेलमध्ये पाठवणारा तक्रारदारच जेरबंद...

Share:
Main Image
Last updated: 10-Jun-2026

जालना, (प्रतिनिधी) १० जून - अंबड येथील तहसीलदार विजय चव्हाण यांच्यावरील ६ लाख ४० हजार रुपयांच्या लाचखोरीच्या कारवाईने राज्यभर खळबळ उडालेली असतानाच, आता या प्रकरणात अत्यंत धक्कादायक आणि नाट्यमय घडामोड समोर आली आहे. तहसीलदार चव्हाण यांना बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात अडकवणारा मुख्य तक्रारदार सुयोग सोळुंके यालाच आता जालना जिल्ह्यातील गोंदी पोलिसांनी अवैध वाळू उत्खनन आणि चोरीच्या गुन्ह्यांमध्ये अटक केली आहे. अंबड न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, या अटकेमुळे वाळू तस्कर आणि प्रशासकीय साखळीच्या वादाला नवे वळण मिळाले आहे.

तडिपारी, सुटका अन् पुन्हा अटक!

तक्रारदार सुयोग सोळुंके हा स्वतः रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर २०२५ मध्ये अवैध वाळू उत्खनन, वाळू चोरी आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. यापूर्वी त्याच्यावर विविध गुन्ह्यांची नोंद असल्याने त्याला एका वर्षासाठी तडीपार देखील करण्यात आले होते. दोन महिन्यांपूर्वीच त्याची या तडिपारीच्या कारवाईतून जामिनावर सुटका झाली होती. मात्र, हे जुने गुन्हे दाखल होऊन बराच कालावधी लोटल्यानंतर, लाचेची कारवाई होताच पोलिसांनी अचानक केलेल्या या अटकेच्या वेळेवर आता विविध स्तरांवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

तहसीलदारांना झाली होती रंगेहाथ अटक

Advertisement

अवैध वाळू उत्खननासाठी वापरण्यात येणारे पोकलेन मशीन आणि ६ हायवा वाहने जप्त न करता ती सुरू ठेवण्यासाठी तहसीलदार विजय चव्हाण यांनी तब्बल ६ लाख ४० हजार रुपयांची लाच मागितली होती. सुयोग सोळुंके याने केलेल्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, तीन दिवसांपूर्वी बीड एसीबीच्या पथकाने सापळा रचून तहसीलदार चव्हाण यांना त्यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली होती.

तीन गुन्हे आणि 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई

सुयोग सोळुंके याच्याविरोधात गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१७/२०२५, २१८/२०२५ आणि २३०/२०२५ असे ३ स्वतंत्र गुन्हे नोंद आहेत. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३(५) तसेच गौण खनिज (विकास व विनियमन) अधिनियमातील कलम ३ आणि ४ अंतर्गत त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणांमध्ये यापूर्वी त्याला अटक झाली होती व नंतर जामीनही मिळाला होता. शिवाय, त्याच्याविरुद्ध अत्यंत कडक मानल्या जाणाऱ्या 'एमपीडीए' (MPDA) कायद्यांतर्गतही कारवाई झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

अंबड न्यायालयाकडून २ दिवसांची कोठडी

या जुन्या वाळू चोरीच्या गुन्ह्यांमध्ये पुन्हा एकदा अटक केल्यानंतर सोळुंके याला जालन्याच्या अंबड न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तक्रारदार सुयोग सोळुंके याला अटक झाली असल्याची अधिकृत माहिती जालना जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी स्वतः प्रसारमाध्यमांना दिली आहे. लाचखोर तहसीलदार अटकेत असतानाच, आता तक्रारदारच वाळू चोरीच्या गुन्ह्यात आत गेल्याने जालना जिल्ह्यात "प्रशासन विरुद्ध वाळू माफिया" यांच्यातील अंतर्गत साखळी आणि संघर्षाची चर्चा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

Advertisement

Comments

No comments yet.