मुंबई, (प्रतिनिधी) ८ जून - राज्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि तत्सम अन्नपदार्थांच्या बेकायदेशीर खरेदी-विक्री व वाहतुकीविरोधात अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने अत्यंत तीव्र मोहीम सुरू केली आहे. अवघ्या पाच दिवसांत (१ ते ५ जून २०२६) राज्यभरात टाकलेल्या १९५ धाडींमध्ये तब्बल १ कोटी ९९ लाख १८ हजार ४७५ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी १९२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अवैध उत्पादन, साठवणूक आणि वाहतुकीला कायमचा आळा घालण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या थेट निर्देशानुसार ही व्यापक मोहीम राबवली जात आहे.
'भारतीय न्याय संहिता' आणि 'अन्न सुरक्षा कायद्या'नुसार थेट गुन्हे
या मोहिमेत केवळ साठा जप्त न करता आरोपींना थेट कोठडी दाखवली जात आहे. 'भारतीय न्याय संहिता' (BNS) चे कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच 'अन्न सुरक्षा मानके कायद्या'च्या (FSS Act) विविध कडक कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
राज्यभरातील प्रमुख धडक कारवाया एका नजरेत:
धाराशिव (परांडा): ५ जून रोजी संशयावरून केलेल्या सर्वात मोठ्या कारवाईत १ कोटी २ लाख ६७ हजार २६३ रुपये किमतीचा प्रचंड साठा जप्त करून दोन जणांना बेड्या ठोकल्या.
समृद्धी महामार्ग (सावंगी टोल नाका): ४ जून रोजी महामार्गावर सापळा रचून ६० लाख ५० हजार रुपयांचा गुटखा आणि वाहतूक करणारे वाहन जप्त करण्यात आले.
धुळे (सोनगीर): ३ जून रोजी टाकलेल्या धाडीत २३ लाख ५० हजार रुपयांचा प्रतिबंधित साठा हस्तगत केला.
नांदेड: येथे केलेल्या धडक कारवाईत १७ लाख ५२ हजार ४५० रुपयांचा गुटखा आणि वाहन जप्त करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड (मोशी): चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६ लाख १९ हजार ९८२ रुपयांचा साठा जप्त करत ६ जणांवर गुन्हे दाखल केले.
मुंबई आणि पुणे परिमंडळात सर्वाधिक धाडी
बृहन्मुंबई क्षेत्रात अधिकाऱ्यांनी ३० ठिकाणी धाडी टाकून ३ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आणि ३० जणांना अटक केली. तर पुणे क्षेत्रात सर्वाधिक ७९ ठिकाणी धाडी टाकून ८ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ७८ जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती सह आयुक्त (अन्न) महेश ना. चौधरी यांनी दिली आहे. या धडक सत्रामुळे राज्यातील गुटखा आणि पानमसाला तस्करांचे धाबे दणाणले आहेत.