छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) ८ जून - "देशातील शिक्षण व्यवस्थेत सातत्याने होणाऱ्या गोंधळाला आणि पेपर लीक प्रकरणाला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. जर शिक्षण मंत्र्यांची जबाबदारी निश्चित होत नसेल, तर यात थेट पंतप्रधानांचीही जबाबदारी येते. जे पंतप्रधान रशिया आणि युक्रेनचे युद्ध थांबवू शकतात, ते देशातील पेपर लीक का थांबवू शकत नाहीत?" असा थेट आणि अत्यंत टोकदार सवाल 'कॉकरोच जनता पार्टी'चे (CJP) संस्थापक अभिजित दीपके यांनी उपस्थित केला आहे. 'नीट' (NEET) आणि 'सीबीएसई' (CBSE) परीक्षांमधील गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर, "सिस्टीम नीट करायची असेल तर आवाज उठवावा लागेल!" अशी ठाम भूमिका घेत त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
"लेकरं राजकारणावर बोलतात म्हणून घाबरू नका" – पालकांना आवाहन
आजच्या राजकीय वातावरणात सर्वसामान्य पालकांमध्ये असलेल्या भीतीवर बोट ठेवत अभिजित दीपके यांनी पालकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले:
"मला माहिती आहे, जेव्हा तुमची लेकरं राजकारणावर बोलत असतील किंवा सरकारला प्रश्न विचारत असतील, तेव्हा तुम्हाला भीती वाटत असेल. पण घाबरू नका! तुम्ही घाबरता आणि या सरकारला प्रश्न विचारत नाही, म्हणूनच आज नीट आणि सीबीएसईसारख्या गंभीर भानगडी देशात घडत आहेत. तुमच्या याच भीतीमुळे आपल्या लेकरांचं भविष्य उद्ध्वस्त होत आहे."
देशातील तरुणांनी आणि पालकांनी व्यवस्थेतील त्रुटींवर प्रश्न विचारले पाहिजेत, तरच विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
"विरोधक, पत्रकार पाकिस्तानी तर मग भारतीय कोण? केवळ भाजपवालेच का?"
सत्ताधाऱ्यांकडून आणि त्यांच्या आयटी सेलकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या 'देशद्रोही' किंवा 'पाकिस्तानी' या लेबलिंगचा त्यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला. आपल्या भाषणात संतप्त सवाल उपस्थित करत ते म्हणाले:
"तुम्ही मला पाकिस्तानी म्हणता, तुम्ही काही पत्रकारांना पाकिस्तानी म्हणता, तुम्ही विरोधकांना पाकिस्तानी म्हणता... मग या देशात खरं भारतीय कोण आहे? फक्त भाजपवाले आणि त्यांचे आयटी सेलवालेच या देशात भारतीय आहेत का?"
टीका करणाऱ्या प्रत्येकाला थेट देशद्रोही ठरवण्याच्या या प्रवृत्तीमुळे देशातील लोकशाही धोक्यात येत असल्याचा इशाराही त्यांनी या निमित्ताने दिला. एकूणच, परीक्षांमधील घोटाळे आणि दडपशाहीच्या राजकारणाविरोधात आता जनतेनेच निर्भीडपणे पुढे येऊन आवाज उठवण्याची वेळ आली आहे, असा सूर दीपके यांनी आळवला.