कोल्हापूर, (प्रतिनिधी) ७ जून - गोरगरीब आणि सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणाऱ्या महागाईत रविवारी पुन्हा एकदा मोठी भर पडली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या (LPG) दरात पुन्हा एकदा २९ रुपयांची वाढ केली आहे. गेल्याच महिन्यात सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर महिनाभरातच ही दुसरी दरवाढ झाल्याने गृहिणींचे बजेट पूर्णपणे कोलमडणार आहे. या नव्या किमती आजपासूनच लागू झाल्या आहेत.
यावरूनच आता राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "जनतेला टप्प्याटप्प्याने झटके देणे, हेच केंद्र सरकारचे महागाई नियंत्रणाचे सूत्र आहे," अशा शेलक्या शब्दांत पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला.
पंतप्रधानांच्या दाव्यावर पवारांचे बोट
कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांना पत्रकारांनी या गॅस दरवाढीबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "देशात इंधन आणि गॅसचे दर सातत्याने वाढत आहेत. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्ही महागाई नियंत्रणात ठेवली असल्याचा दावा करतात. मात्र, प्रत्यक्षात दुसरीकडे जनतेला टप्प्याटप्प्याने दरवाढीचे झटके दिले जात आहेत. हेच का तुमचे महागाई नियंत्रण?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सत्ताधाऱ्यांना योग्य वेळी किंमत मोजावी लागेल!
"गॅसच्या किमती लागोपाठ दोनवेळा वाढवण्यात आल्या आहेत. या दरवाढीचा थेट फटका सर्वसामान्य कुटुंबांना बसतो, त्यांच्या प्रपंचावर याचा परिणाम होतो. जनता या महागाईत होरपळत असून, या सगळ्याची किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य वेळी नक्कीच समजेल," असा कडक इशाराही शरद पवार यांनी केंद्र सरकारला दिला.
महिनाभरात तब्बल ८९ रुपयांची (६० रुपये + २९ रुपये) वाढ झाल्याने सर्वसामान्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर झालेल्या या दरवाढीमुळे आता महागाईचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.