नवी दिल्ली (प्रतिनिधी) ६ जून -
राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेत (NEET) झालेल्या कथित पेपरफुटी आणि निकालातील घोळामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमधील असंतोषाचा अखेर दिल्लीत स्फोट झाला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तात्काळ राजीनाम्याच्या मागणीसाठी आज शनिवारी (दि. ६ जून) दिल्लीतील ऐतिहासिक जंतर-मंतर मैदानावर हजारो विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक आणि समर्थकांनी एकत्र येत 'महाआंदोलन' छेडले. 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला देशभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, रणरणत्या उन्हात हजारो तरुणांनी रस्ते अडवून जंतर-मंतर परिसर पूर्णपणे जाम केला होता. या देशव्यापी आंदोलनामुळे केंद्र सरकारवर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे.
...म्हणून पक्षाचे नाव 'कॉकरोच'; उद्धव ठाकरेंसह महायुती-महाविकास आघाडीचे लक्ष
NEET आणि CBSE परीक्षांमधील सातत्यपूर्ण घोळामुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडले आहे. या गंभीर मुद्द्यावरून विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकण्याऐवजी सरकारने 'कॉकरोच जनता पार्टी'च्या सोशल मीडिया खात्यांवर (Social Media Accounts) डिजिटल कारवाई करून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. या दडपशाहीवर पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली.
या आंदोलनाची दखल घेत शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला सज्जड दम भरला आहे.
"ज्यांना आपण देशाचे भाग्यविधाते आणि भवितव्य म्हणतो, ते हजारो तरुण आपल्या वेदना व भविष्याची चिंता घेऊन रणरणत्या उन्हात रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना ‘कॉक्रोच’ म्हणून हिणवणे व न्याय नाकारणे अत्यंत चुकीचे आणि क्लेशदायक आहे. NEET पेपरफुटीने लाखो युवा वर्ग उद्धवस्त झाला आहे. आज सर्व पीडित तरुण-तरुणी अन्यायाविरुद्ध 'कॉक्रोच' बनून आक्रोश करीत आहेत. सरकारला त्यांचे म्हणणे ऐकावेच लागेल. 'कॉक्रोच'ना कमी लेखू नका, हाच गंभीर इशारा जंतरमंतरवरील आजच्या आंदोलनाने हुकूमशाही सरकारला दिला आहे."
– उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना (UBT)
"आपण सरकारच्या भीतीत किती काळ जगणार?" : अभिजीत दिपके
दिल्लीत आंदोलन सुरू असतानाच दुसरीकडे खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रात अभिजीत दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे.
घरी पोलीस पाठवून सुरू असलेल्या दडपशाहीवर दिल्लीतून संताप व्यक्त करताना अभिजीत दिपके म्हणाले, "मी दिल्लीत आंदोलनासाठी निघाल्यापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये माझ्या घरात वृद्ध आईला खूप भीती वाटत होती की हे सरकार मला तुरुंगात टाकेल. जेव्हा देशातील एखादे मूल या सरकारच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध आवाज उठवते, तेव्हा या देशातील प्रत्येक आईला आपल्या मुलाच्या सुरक्षिततेची हीच भीती वाटते. आपण या सरकारच्या भीतीच्या छायेत आणखी किती काळ जगणार आहोत? हा लढा आता थांबणार नाही."
युवकांच्या हितासाठी देशव्यापी पाठिंबा; धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामाच हवा!
जंतर-मंतरवरील आंदोलनात सहभागी झालेल्या विविध विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले की, NEET आणि CBSE परीक्षेत घातलेला घोळ तसेच केंद्र शासनाच्या अनेक चुकीच्या आणि विद्यार्थीविरोधी धोरणांचा थेट फटका देशातील गुणवंत विद्यार्थ्यांना बसला आहे. यामुळेच आज देशातील संपूर्ण युवा वर्ग पेटून उठला आहे.
देशातील युवकांच्या हितासाठी आणि पारदर्शक शिक्षण व्यवस्थेसाठी असलेल्या या आंदोलनाला देशभरातील विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी एकमुखाने पाठिंबा दिला आहे. "लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य मातीत मिळवणाऱ्या आणि पेपरफुटी रोखण्यात अपयशी ठरलेल्या केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिलाच पाहिजे," ही एकच प्रमुख मागणी घेऊन आता विद्यार्थी संघटना देशभरात व्यापक आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहेत.