...तर तुमचे नाव मतदार यादीतून डिलिट होणार...   नव्या मतदार नोंदणीसाठी हा दाखला ठरणार कळीचा...  वाचा काय आहे नियम?

Share:
Main Image
Last updated: 02-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २ जून - तुम्ही मतदानासाठी पात्र आहात, पण मतदार यादीत तुमचे नाव नसेल किंवा बीएलओ (BLO) घरी आल्यावर तुम्ही दांडी मारली, तर आगामी निवडणुकीत मतदानाचा हक्क हुकू शकतो! केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार याद्या अचूक करण्यासाठी 'एसआयआर' (Special Intensive Revision - विशेष सखोल पुनरिक्षण) मोहीम जाहीर केली आहे. या मोहिमेत जर 'बीएलओ' तुमच्या घरी सलग तीन वेळा येऊनही तुम्ही भेटला नाहीत किंवा फॉर्म भरून दिला नाही, तर मतदार यादीतून तुमचे नाव थेट वगळले जाऊ शकते. या मोहिमेत प्रामुख्याने बोगस, दुबार, मयत किंवा इतरत्र स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे यादीतून काढून टाकली जाणार असून, नवीन पात्र मतदारांची नोंदणी केली जाईल.

 असे आहे 'एसआयआर' मोहिमेचे टाईमटेबल (महाराष्ट्र)
२० ते २९ जून २०२६: 'बीएलओ' (BLO) कर्मचाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण.
३० जून ते २९ जुलै २०२६: बीएलओ प्रत्यक्ष घरोघरी जाऊन माहिती गोळा करणार.
५ ऑगस्ट २०२६: कच्ची (प्रारूप) मतदार यादी प्रसिद्ध होणार.
५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६: नावात चूक असल्यास किंवा नाव नसल्यास दावा-हरकत घेण्याची मुदत.
७ ऑक्टोबर २०२६: अंतिम (फायनल) मतदार यादी प्रसिद्ध होणार.

Advertisement

वयानुसार 'या' नियमांचे पालन करणे बंधनकारक
निवडणूक आयोगाने मतदारांच्या जन्मवर्षानुसार कागदपत्रांचे नियम निश्चित केले आहेत:
केस १ (२००२ च्या यादीत नाव असल्यास): जर तुमचे नाव २००२ च्या यादीत आधीपासूनच असेल, तर तुम्हाला कोणतेही नवीन कागदपत्र देण्याची गरज नाही. फक्त 'मॅपिंग फॉर्म' भरून सही द्यावी लागेल.
केस २ (१ जुलै १९८७ पूर्वीचा जन्म व यादीत नाव नसल्यास): जन्मतारीख आणि जन्मस्थळाच्या पुराव्यासाठी आयोगाने मान्यता दिलेल्या ११ कागदपत्रांपैकी कोणताही १ पुरावा द्यावा लागेल.
केस ३ (१ जुलै १९८७ ते २ डिसेंबर २००४ दरम्यानचा जन्म): मतदार नोंदणीसाठी स्वतःच्या जन्माच्या पुराव्यासोबतच आई किंवा वडिलांपैकी एकाचा जन्मपुरावा देणे सक्तीचे आहे.
केस ४ (२ डिसेंबर २००४ नंतरचा जन्म): स्वतःच्या जन्मपुराव्यासोबतच आई आणि वडील या दोघांचेही जन्मपुरावे सादर करावे लागतील.

घरी नसाल तर दारावर नोटीस!
मोहीम काळात बीएलओ तुमच्या घरी तीन वेळा भेट देतील. तिन्ही वेळेस तुम्ही उपलब्ध नसल्यास घराच्या दारावर नोटीस डकवली जाईल. त्यानंतरही संपर्क न झाल्यास मतदार यादीतून नाव कट करण्याची प्रक्रिया सुरू होईल.

 पुरावा म्हणून चालणारी '११' अधिकृत कागदपत्रे
१. जन्मदाखला, २. पासपोर्ट, ३. जात प्रमाणपत्र, ४. डोमिसाईल (अधिवास प्रमाणपत्र), ५. १०वी/१२वीचे प्रमाणपत्र (बोर्ड सर्टिफिकेट), ६. कुटुंब नोंदवही (रेशन कार्ड/गॅझेट), ७. सरकारी जमीन/घराची कागदपत्रे, ८. सरकारी ओळखपत्र, ९. पेन्शन आदेश, १०. वनहक्क प्रमाणपत्र, ११. १ जुलै १९८७ पूर्वीचे बँक किंवा पोस्टाचे पासबुक.
महत्त्वाची टीप: नागरिकांना बीएलओ व्यतिरिक्त स्वतः ऑनलाईन पद्धतीनेही नाव नोंदणी किंवा दुरुस्ती करता येणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाच्या http://voters.eci.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Comments

No comments yet.