नाशिक, (प्रतिनिधी) २ जून - शहरातील कोणार्क नगर परिसरात राहणाऱ्या दोन परप्रांतीय सतरा वर्षीय मैत्रिणी अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या दोन्ही मुलींना कुणीतरी फुस लावून पळवून नेल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला असून, याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही कुटुंबे मूळची नेपाळ येथील असून, ते नाशिकमधील श्रीरामनगर भागात शेजारी राहतात. दोन्ही मुली समवयस्कर असल्याने त्यांच्यात घनिष्ठ मैत्री होती. त्यांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. दरम्यान, शनिवारी (दि. ३० मे) सायंकाळपासून दोन्ही मुली घरी कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्या आहेत. बराच वेळ उलटूनही त्या परत न आल्याने कुटुंबियांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, परंतु त्या मिळून आल्या नाहीत.
मुली घरातून निघून गेल्या असून, त्यांना अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेले असावे, असा संशय पालकांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी बेपत्ता मुलीच्या ४८ वर्षीय आईने दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार बहिरम करत आहेत.