मुंबई, (विशेष प्रतिनिधी) २ जून - राज्यात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याच्या बेकायदेशीर विक्रीविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अत्यंत आक्रमक मोहीम उघडली आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या थेट निर्देशानुसार ३० आणि ३१ मे २०२६ या दोन दिवसांत राज्यभरात धाडी टाकून तब्बल ३२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत गुटख्याची विक्री आणि साठा करणाऱ्या २६ आस्थापना (दुकाने/गोदामे) सील करण्यात आल्या असून, १२ लाख १६ हजार ९६५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कोकण विभागात सर्वाधिक कारवाई; १६ अटकेत
बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती या विभागांमध्ये ही धडक मोहीम राबवण्यात आली. यामध्ये सर्वाधिक कारवाई कोकण विभागात झाली असून, तिथे १६ आस्थापनांवर टाळे ठोकून १६ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर: ११ ठिकाणी कारवाई करून ७ जणांना अटक.
पुणे: ३ ठिकाणी धाडी टाकून २ आरोपींना अटक.
अमरावती: ३ ठिकाणी कारवाई करून ३ जणांना अटक.
नाशिक: २ ठिकाणी कारवाई करून २ जणांना अटक.
बृहन्मुंबई: एका ठिकाणी कारवाई करत २ जणांना अटक करण्यात आली.
'भारतीय न्याय संहिता' अंतर्गत गुन्हे दाखल
नियमभंग करणाऱ्या या गुटखा विक्रेत्यांवर आणि आस्थापनांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींवर नवीन कायद्यानुसार 'भारतीय न्याय संहिता' (BNS) चे कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या (FSSAI) विविध कलमांतर्गत एफआयआर (FIR) दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
भेसळीविरुद्ध नागरिकांनी पुढे यावे: आयुक्त तुकाराम मुंढे
कोणत्याही अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत किंवा त्यात होणाऱ्या भेसळीबाबत शंका आल्यास नागरिकांनी थेट अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. तक्रार करताना नागरिकांनी स्वतःचे नाव, संपर्क क्रमांक, भेसळ होणाऱ्या ठिकाणाचा अचूक पत्ता आणि अन्नपदार्थाची माहिती स्पष्टपणे नमूद करावी, जेणेकरून तातडीने कारवाई करणे शक्य होईल, असेही त्यांनी सांगितले.
एफडीएच्या या देशधडक कारवाईमुळे राज्यभरातील गुटखा आणि पानमसाला तस्करांचे धाबे दणाणले आहेत. ही मोहीम यापुढेही अशीच कडकपणे सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.