मुंबई, (प्रतिनिधी) २ जून - पोषण, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या अत्यंत संवेदनशील आणि मूलभूत शासकीय योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवणाऱ्या हजारो 'योजना कर्मचाऱ्यांनी' (स्कीम वर्कर्स) आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आज मुंबईतील आझाद मैदानावर 'आक्रोश ठिय्या आंदोलन' सुरू केले. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू - CITU) संलग्न योजना कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने या आंदोलनाची हाक देण्यात आली असून, पहिल्याच दिवशी अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक आणि शालेय पोषण आहार कामगारांनी आझाद मैदान दणाणून सोडले. या आंदोलनात ९० टक्क्यांहून अधिक महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग असून, "कामगार विरोधी धोरणे राबवणाऱ्या सरकारला आता शांत बसू देणार नाही," असा इशारा कामगार नेत्यांनी दिला आहे.
'५० वर्षे झाली, तरी योजना तात्पुरत्याच कशा?' : सिटूचा सवाल
आंदोलनाला मार्गदर्शन करताना सिटूचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड आणि राज्य सरचिटणीस एम. एच. शेख यांनी शासनाच्या दुटप्पी भूमिकेवर तीव्र प्रहार केला. अंगणवाड्या ज्या योजनेअंतर्गत सुरू झाल्या, त्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेला (ICDS) ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानाला २८ वर्षे, तर पंतप्रधान माध्यान्ह भोजन योजनेला ३१ वर्षे पूर्ण झाली आहेत.
"पिढ्यानपिढ्या देशाचे मनुष्यबळ घडवणाऱ्या या योजना कधीही तात्पुरत्या असू शकत नाहीत. तरीही केंद्र व राज्य शासन या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यास टाळाटाळ करत आहे. ९० टक्के महिला कर्मचारी असलेल्या या क्षेत्रात शासनाकडून हक्कांचे शोषण केले जात आहे आणि हा खोटा देखावा आता कर्मचारी खपवून घेणार नाहीत," असे कामगार नेत्यांनी ठणकावून सांगितले.
मंत्र्यांसोबत बैठकांचे सत्र; आंदोलन सुरूच राहणार
या आंदोलनाच्या तीव्रतेची दखल घेत २९ मे रोजीच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी प्रधान सचिव आणि आयसीडीएस आयुक्तांच्या उपस्थितीत कामगार प्रतिनिधींसोबत सकारात्मक चर्चा केली होती. आज राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आयुक्तांनीही शिष्टमंडळाला चर्चेसाठी निमंत्रित केले होते. उद्या (२ जून) या सर्व विभागांच्या मंत्र्यांनी शिष्टमंडळाला अंतिम चर्चेसाठी बोलावले आहे. मात्र, ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. दरम्यान, उद्या या आंदोलनात घरेलू कामगार, बांधकाम कामगार आणि बिडी कामगार यांसारखे असंघटित क्षेत्रातील कामगारही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
आंदोलनातील प्रमुख आणि समान मागण्या:
वेतनश्रेणी व सामाजिक सुरक्षा: अंगणवाडी, आशा, गटप्रवर्तक आणि एनएचएम कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करून वेतनश्रेणी लागू करा; तसेच ईएसआयसी, पीएफ, ग्रॅच्युइटी आणि पेन्शन या सामाजिक सुरक्षा द्या.
किमान वेतन: राज्यातील सर्व कंत्राटी व निश्चित कालीन कामगारांना ८ तासांच्या कामासाठी दरमहा किमान ३०,००० रुपये वेतन द्या आणि ज्यादा कामाचा मोबदला दुप्पट दराने द्या.
श्रमसंहितांना विरोध: कॉर्पोरेट धार्जिण्या आणि कामगार विरोधी चार श्रमसंहितांची महाराष्ट्रात अंमलबजावणी करू नका.
वेगवेगळ्या विभागांच्या स्वतंत्र मागण्या:
१. अंगणवाडी कर्मचारी:
मानधन, प्रवास भत्ता आणि सादील खर्च दर महिन्याला नियमितपणे अदा करा.
ऑनलाईन कामासाठी सर्व अंगणवाड्यांमध्ये वाय-फाय सुविधा द्या आणि नोंदवह्या शासनाने पुरवाव्यात.
निकृष्ट दर्जाचा घरपोच आहार (THR) बंद करून अंडी, केळी, कडधान्य असा पोषक आहार द्या. आहाराचा दर २४ रुपये, तर इंधनाचा दर ३ रुपयांपर्यंत वाढवा.
मदतनिसांमधून सेविका झालेल्यांसह सर्व जुन्या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६५ वर्षे करा.
२. आशा व गटप्रवर्तक (NHM):
गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये समायोजित करा.
एनएचएम अंतर्गत १० ते १५ वर्षांपासून काम करणारे डॉक्टर, नर्सेस, १०८ रुग्णवाहिका पायलट आणि इमर्जन्सी मेडिसिन ऑफिसर्सना कायम करून 'समान काम समान वेतन' द्या.
आशांचे गेल्या ६ महिन्यांपासून थकीत असलेले मानधन त्वरित द्या; त्यांना पगारी प्रसूती रजा व दिवाळीला ५,००० रुपये बोनस लागू करा.
३. शालेय पोषण आहार कामगार:
५ जुलै २०२४ च्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर झालेल्या १,००० रुपये मानधन वाढीची फरकासहित तातडीने अंमलबजावणी करा.
कामगारांना १० महिन्यांऐवजी वर्षातील पूर्ण १२ महिने मानधन द्या आणि वर्षातून दोन गणवेश पुरवा.
या नेत्यांनी केले मार्गदर्शन...
आझाद मैदानावरील या आक्रोश आंदोलनाला सिटू केंद्राच्या पदाधिकारी उषा रानी, मुंबईच्या निवृत्त प्राध्यापक सुचिता कृष्णप्रसाद, डॉ. डी. एल. कराड, एम. एच. शेख, अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा शुभा शमीम, महासचिव संगीता कांबळे, आशा फेडरेशनच्या अध्यक्षा आनंदी अवघडे, महासचिव पुष्पा पाटील, शालेय पोषण आहार कामगार संघटनेचे अध्यक्ष ए. बी. पाटील, महासचिव डॉ. अशोक थोरात आणि अर्धवेळ स्त्री परिचर युनियनच्या अध्यक्षा मंगला मेश्राम आदी नेत्यांनी संबोधित करत आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली.