"शिवसेनेचे मुंडके उडवण्याचे काम मित्रपक्षच करतोय"... अब्दुल सत्तारांचा भाजपवर थेट आणि गंभीर हल्ला...

Share:
Main Image
Last updated: 01-Jun-2026

छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) १ जून - विधानपरिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election 2026) अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यात महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आणि युद्ध अखेर चव्हाट्यावर आले आहे. छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महायुतीतर्फे भाजपच्या सुहास शिरसाट यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, या निर्णयाला थेट आव्हान देत शिवसेनेचे (शिंदे गट) नेते व मंत्री अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. या बंडखोरीनंतर स्वतः अब्दुल सत्तार यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप करत महायुतीत मोठी खळबळ उडवून दिली आहे.
"शिवसेनेचे मुंडके उडवण्याचे काम आपला मित्रपक्षच करत आहे," अशा अत्यंत आक्रमक शब्दांत अब्दुल सत्तार यांनी आपला राग व्यक्त केला आहे.

"भाजपने आमचे हातपाय तोडले, आता मुंडकेच कापले!"
मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना अब्दुल सत्तार यांचा भाजपवरील राग अनावर झाला. महायुती स्थापनेच्या वेळच्या आठवणींना उजाळा देत ते म्हणाले, "आमचा त्याग गुवाहाटीतील कामाख्या देवीला माहिती आहे, पण भाजप तो त्याग आता पूर्णपणे विसरली आहे. भाजप आमच्या पक्षात गटतट पाडत आहे. त्यांनी आमचे हातपाय आधीच तोडले होते, आता थेट मुंडकेच तोडून टाकले आहे. जिल्ह्यात शिवसेनेत दोन भाग करून एका भागाला हाताशी धरायचे आणि दुसऱ्यावर अन्याय करायचा, अशी खेळी खेळून जर आमचा 'मोठा भाऊ' आम्हालाच संपवणार असेल, तर आमच्याकडे दुसरा इलाज नाही."
पुढे बोलताना त्यांनी अत्यंत खेदाने म्हटले की, "आमची जिल्हा परिषद गेली, महापालिकेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकऱ्यांच्या काळापासून असणारी सत्ताही संपली, आता आमच्याकडे राहिलेच काय? अनेक छोट्या जागांवर वैयक्तिक भाजपचे नेते मोठे होत आहेत आणि शिवसेनेला जाणीवपूर्वक संपवले जात आहे."

Advertisement

"दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत!"
उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी "दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत" असे विधान केले होते. याबाबत विचारले असता अब्दुल सत्तार यांनी त्याला थेट दुजोरा दिला. ते म्हणाले, "मलाही प्रामाणिकपणे वाटते की आता दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत. आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी जर एकत्र येण्याचा निर्णय घेतला, तर कोणालाही विचारण्याची गरज उरणार नाही. माझा नेता जो निर्णय घेईल, तो मला पूर्णपणे मान्य असेल." सत्तारांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भविष्यात नवीन समीकरणे उदयास येणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.

"महाराष्ट्रात आमची पश्चिम बंगालसारखी 'ममता' होऊ नये!"
राज्यातील राजकीय परिस्थितीची तुलना थेट पश्चिम बंगालशी करताना सत्तार म्हणाले, "पश्चिम बंगालमध्ये एकेकाळी ममता बॅनर्जी आणि भाजप एकत्र होते. नंतर त्यांच्यातील समन्वय तुटला आणि आज ते एकमेकांचे कट्टर शत्रू बनले आहेत. महाराष्ट्रात आमची तशी 'ममता' होऊ नये, याची काळजी आणि दक्षता माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे."

४ जूनच्या माघारीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!
उमकेद्वारी अर्ज भरण्याच्या अवघ्या काही तास आधी समीर सत्तार यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. आता येत्या ४ जून रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. तोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे वरिष्ठ नेते अब्दुल सत्तारांचे हे बंड शांत करण्यात यशस्वी ठरतात की महायुतीमध्ये उभी फूट पडते? आणि सत्तारांच्या या थेट हल्ल्यावर भाजप काय पलटवार करणार? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Comments

No comments yet.