अकरावी प्रवेशासाठी याची सक्ती नाही...  शिक्षण विभागाचा मोठा दिलासा...

Share:
Main Image
Last updated: 31-May-2026

मुंबई, (विशेष प्रतिनिधी) ३१ मे - दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना अद्याप शाळेकडून मूळ गुणपत्रक (Marksheet) आणि शाळा सोडल्याचा दाखला (LC) मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर, अकरावी प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना कोणताही अडथळा येऊ नये म्हणून कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेश निश्चित करताना या कागदपत्रांची तात्काळ सक्ती करू नये, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानुसार हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून यामुळे हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हमीपत्राच्या आधारे प्रवेश होणार निश्चित
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि कनिष्ठ महाविद्यालयांना यासंबंधीच्या सूचना जारी केल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांना अद्याप मूळ कागदपत्रे मिळालेली नाहीत, त्यांच्याकडून 'गुणपत्रक व दाखला उपलब्ध होताच सादर केला जाईल' असे हमीपत्र (Undertaking) लिहून घेऊन महाविद्यालयांना त्यांचा प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.

नियमित फेरी-१ ची गुणवत्ता यादी जाहीर
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत सध्या 'नियमित फेरी क्रमांक १' सुरू असून २९ मे २०२६ रोजी त्याची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पालकांची कागदपत्रांसाठी होणारी धावपळ थांबवण्यासाठी ही अट तात्पुरती शिथिल करण्यात आली आहे. तसेच, ज्या विद्यार्थ्यांचे 'आधार' पडताळणी (Verify) झालेली आहे, त्यांच्या गुणपत्रिका 'डिजीलॉकर' (DigiLocker) वर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Advertisement

विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची नोंद
मूळ कागदपत्रांची अट तात्पुरती शिथिल करण्यात आली असली, तरी दिलेल्या निर्धारित कालावधीत ती सादर करणे बंधनकारक असेल. जर विद्यार्थ्यांनी ठरवून दिलेल्या वेळेत गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला जमा केला नाही, तर त्यांचा अकरावीचा प्रवेश रद्द केला जाऊ शकतो. याची जाणीव महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थी व पालकांना करून द्यावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

या निर्णयामुळे कागदपत्रांच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश प्रक्रियेत वेळेत सहभागी होणे शक्य होणार असून, संपूर्ण प्रक्रियेला अधिक गती आणि सुलभता मिळेल, असा विश्वास मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला आहे.

?s=20

Comments

No comments yet.