नाशिक, (प्रतिनिधी) ३० मे - राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर गेल्या सव्वा दोन महिन्यांत पोलिसांनी राज्यभरात तब्बल ५० भोंदू बाबांचे 'दुकान' बंद केले आहे. या सर्व ५० भोंदू बाबांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, यामध्ये सर्वाधिक ५ गुन्हे नाशिक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. या धक्कादायक आकडेवारीची अधिकृत माहिती 'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती'चे (अंनिस) राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, बुवाबाजी संघर्ष विभागाच्या कार्यवाह ॲड. रंजना गवांदे आणि सहकार्यवाह विष्णूदास लोणारे यांनी दिली आहे. ही संपूर्ण यादी अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी संकलित केली आहे.
महिलांचे शारीरिक व आर्थिक शोषण अधिक
दाखल झालेल्या ५० प्रकरणांचे विश्लेषण केले असता, त्यातील बहुतांश घटनांमध्ये महिलांचे मोठ्या प्रमाणावर लैंगिक व शारीरिक शोषण झाल्याचे समोर आले आहे. भोंदू बाबांनी ग्रामीण आणि शहरी, अशा दोन्ही भागांतील महिला व पुरुषांना जाळ्यात ओढून त्यांची मोठी आर्थिक लूटही केली आहे. अनेक पीडित महिला सामाजिक प्रतिष्ठा आणि भीतीपोटी समोर येण्यास घाबरत होत्या; मात्र नाशिकच्या खरात प्रकरणानंतर महिलांमध्ये लढण्याची हिंमत आणि न्यायाची अपेक्षा निर्माण झाली असून, त्यांनी धैर्याने तक्रारी दाखल केल्या आहेत.
सर्वच धर्मांतील भोंदू रडारवर; सनातनी आरोपांना उत्तर
अंनिसने प्रसिद्ध केलेल्या यादीवरून असे स्पष्ट होते की, गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये सर्वच धर्मांतील भोंदू बाबा, मांत्रिक आणि पाद्र्यांचा समावेश आहे. त्यामुळे "अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केवळ एकाच धर्मात केले जाते," या सनातनी आरोपांना या कारवाईतून चोख उत्तर मिळाले असल्याचे अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
जादूटोणा विरोधी कायद्याची अपूर्ण अंमलबजावणी
समाजातील ही फसवणूक रोखण्यासाठी शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि अंनिसने १८ वर्षे संघर्ष केला. त्यानंतर २०१३ मध्ये ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा विरोधी कायदा’ अस्तित्वात आला. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले. मात्र, या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात सरकार अद्यापही अयशस्वी ठरले आहे. असे असूनही, अंनिस आपल्या पातळीवर प्रबोधन आणि प्रचार करत असल्याने नागरिक स्वतःहून पुढे येऊन गुन्हे दाखल करत आहेत.
राज्यात 'या' ५० भोंदूंवर गुन्हे दाखल (जिल्ह्यानुसार आकडेवारी):
जिल्हा दाखल गुन्हे (संशयित भोंदूंची नावे आणि परिसर)
नाशिक (सर्वाधिक ५)
अशोक कुमार खरात (नाशिक)
विठोबा वाल्मीक जाट (सातपूर)
महेशगिरी उर्फ महेश काकडे (लासलगाव)
चंद्रकांत राजेंद्र माळी (इगतपुरी)
कमलेश महाराज अधिकारी (इंदिरानगर)
पुणे (१०)
पंकज देवराम घोलप (येडगाव)
नाना बर्डे (आळेफाटा)
किसन तळपे (मंदोशी, खेड)
अनिल सोलोमन सिंग - पादरी (पुणे)
पिंटू धुमाळ (बारामती)
औदुंबर गडदे (स्वारगेट)
नवनाथ गवळी (खेड)
श्याम महाराज राठोड (दिघी)
परमेश्वर उर्फ प्रमोद गायकवाड (उत्तमनगर)
शितल सालके व पोर्णिमा सारस्वत (भारती विद्यापीठ)
परवेज अब्दुल अजीज मेमन (कोंढवा)
अहिल्यानगर (६)
गडगेबाबा राजेंद्र गडगे (संगमनेर)
गणेश शिंदे (श्रीरामपूर)
अशोक मधुकर आढाव (श्रीरामपूर)
शिव भाऊ सोनवणे (सर्जेपुरा)
यशवंत एकनाथ थोरात (पारनेर)
राजू बन्सी दिवटे (पारनेर)
मुंबई व उपनगरे (७)
ऋषिकेश वैद्य (वसई)
अल्ताफ रईस खान (मालाड)
रिधम पांचाळ (मालाड)
अर्जुन चव्हाण उर्फ टनटन बाबा (नवी मुंबई)
इरफान नियाज अहमद (कांदिवली)
रमेश गुप्ता (मालाड)
मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित (ठाणे)
सोलापूर (३)
मोहन मामा भोसले (कुर्डुवाडी)
नाना महाराज उर्फ गुरु माऊली वीरकर (टेंभुर्णी)
महेश मोहन बाबर (विटा, सांगली हद्दीजवळ)
धुळे व जळगाव (३) १९) अल्ताफ हसन मदारी (जळगाव)
कृष्णा उर्फ भगत सुभाष चित्ते (पश्चिम देवपूर, धुळे)
योगेश उर्फ भैय्या बापू खैरनार (निजामपूर, साक्री)
मराठवाडा (४)
ज्ञानेश्वर नागोराव कोरडे (बिलोली, नांदेड)
हरिगिरी दत्तगिरी महाराज (भाग्यनगर, नांदेड)
भीमराव पुंजाराम बिहाडे (संभाजीनगर)
मुक्तानंदगिरी महाराज उर्फ बापू महाराज (कन्नड, संभाजीनगर)
विदर्भ (६)
चेतन सुनील माळी (मूर्तिजापूर, अकोला)
हेमदास किसन बावणे (अड्याळ, भंडारा)
सुधाकर गाडगे (बाळापूर, अकोला)
ताहीर रशीद बेग (सक्करदरा, नागपूर)
सुधाकर रमेश काळे (अमरावती) व अशोक रामधन राठोड (यवतमाळ)
विठ्ठल पवार (यवतमाळ)
गंगाधर बुरांडे (सावली, चंद्रपूर)
इतर जिल्हे (२)
अब्दुल रशीद शेख (खालापूर, रायगड)
शिवराम पराश सावर (पालघर)
शाहिद शेख (खडकपाडा, कल्याण)
(टीप: काही प्रकरणांमध्ये कायदेशीर कलमांनुसार स्थानिक पोलीस अधिक तपास करत आहेत.)
नागरिकांसाठी अंनिसचे आवाहन
महाराष्ट्रात अद्यापही अनेक पीडित महिला व नागरिक अशा भोंदू बाबांच्या त्रासामुळे समोर येण्यास कचरत आहेत. त्यांनी न घाबरता पुढे यावे. तसेच, समाजात कुठेही अशी फसवणूक किंवा अघोरी प्रथा सुरू असल्यास नागरिकांनी तात्काळ अंनिसशी किंवा स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.