अहिल्यानगर, (प्रतिनिधी) ३० मे - राज्यभरात आगामी विधान परिषद निवडणुकीचे वारे वाहू लागले असून महाविकास आघाडीचे (MVA) जागावाटप जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. एकूण १७ जागांपैकी तब्बल १५ जागांवर आघाडीत एकमत झाले असून, यात काँग्रेस सर्वाधिक ८ जागा लढविणार आहे. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ३ जागा लढविणार असल्याचे समजते. या संपूर्ण जागावाटपात 'अहिल्यानगर'ची जागा काँग्रेसच्या पदरात पडली असून, येथून श्रीरामपूरचे तरुण नेते करण ससाणे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
पवार गटाचा अहिल्यानगरवरील दावा मागे; काँग्रेससाठी जागा मोकळी
या जागावाटपातील सर्वात लक्षवेधी घडामोड म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी अहिल्यानगर जिल्ह्यावरील आपला पारंपरिक दावा सोडला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीही दोन्ही पक्षांमध्ये जागा अदलाबदलीचा प्रस्ताव आला होता, मात्र तेव्हा राष्ट्रवादीने आपला दावा सोडला नव्हता. या निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाला पुणे, ठाणे आणि सातारा-सांगली या तीन जागा मिळणार आहेत. अहिल्यानगरमध्ये सध्या काँग्रेसचे ३५ तर राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे २९ मतदार संख्याबळ आहे.
करण ससाणेंच्या रूपाने 'ससाणे विरुद्ध जगताप' संघर्षाची पुनरावृत्ती?
काँग्रेसकडून श्रीरामपूरमधील दिवंगत नेते जयंत ससाणे यांचे चिरंजीव करण ससाणे यांचे नाव आघाडीवर असून त्यांनी यापूर्वीच उमेदवारी अर्जही नेला आहे. करण ससाणे यांनी श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीत दमदार कामगिरी करत स्वतःचे नेतृत्व सिद्ध केले आहे.
विशेष म्हणजे, भूतकाळात त्यांचे वडील जयंत ससाणे यांनी ही स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक लढविली होती. मात्र, त्यावेळी अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या अरुणकाका जगताप यांनी ससाणे यांचा धक्कादायक पराभव केला होता. आता जयंत ससाणे यांचे चिरंजीव करण ससाणे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असतानाच, त्यांचे जुने प्रतिस्पर्धी अरुणकाका जगताप यांचे चिरंजीव सचिन जगताप हेही इच्छुक असून त्यांनीही उमेदवारी अर्ज उचलला आहे. त्यामुळे या निवडणुकीत पुन्हा एकदा 'ससाणे विरुद्ध जगताप' असा जुना राजकीय संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.