नवी दिल्ली, (विशेष प्रतिनिधी) २९ मे - बदलत्या जागतिक तंत्रज्ञानाचा वेग पकडण्यासाठी केंद्र सरकारने देशातील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI - आर्टिफिशियल इंटेलिजन्स) अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्याचे मोठे पाऊल उचलले आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि उच्चस्तरीय कृती दलाची (Task Force) एक महत्त्वाची बैठक पार पडली. "देशातील अभियांत्रिकी (B.Tech) आणि कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना उद्योगांच्या गरजेनुरूप आधुनिक कौशल्ये मिळावीत, यासाठी एआय अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल केले जात आहेत," अशी माहिती केंद्रीय मंत्र्यांनी या बैठकीनंतर दिली.
नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनीज (NASSCOM) आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी देशातील सध्याच्या अभ्यासक्रमाचा सखोल अभ्यास केला. 'एआय'चा अभ्यासक्रम व्यापक असला तरी त्यात जनरेटिव्ह एआय (Generative AI), मशीन लर्निंग ऑपरेशन्स आणि प्रत्यक्ष व्यावहारिक अनुभवाचा (Practical Experience) अभाव असल्याचे या अभ्यासात समोर आले. ही उणीव भरून काढण्यासाठी नव्या कृती आराखड्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
अभ्यासक्रमात होणारे ६ प्रमुख बदल:
१. प्रॅक्टिकल अनुभवात मोठी वाढ: सध्या अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमात असलेला २५ ते ३० टक्के प्रॅक्टिकल अनुभव आता थेट ४० ते ७५ टक्क्यांपर्यंत वाढवला जाणार आहे.
२. व्यावहारिक अध्यापन पद्धती: पहिल्या सत्रापासूनच विद्यार्थ्यांना केवळ व्याख्याने न ऐकवता उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा (ॲप्लिकेशन-बेस्ड) अनुभव दिला जाईल.
३. लवचिक शैक्षणिक पर्याय (Multiple Entry & Exit): विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे लवचिक पर्याय मिळतील. पहिल्या वर्षानंतर 'प्रमाणपत्र', दुसऱ्या वर्षानंतर 'पदविका' (डिप्लोमा) आणि तिसऱ्या वर्षानंतर 'प्रगत पदविका' (ॲडव्हान्स डिप्लोमा) घेऊन बाहेर पडण्याचा पर्याय असेल.
४. क्रेडिट-संलग्न एकत्रीकरण: 'एआय'चा हा नवीन अभ्यासक्रम औपचारिक शैक्षणिक क्रेडिट प्रणालीमध्ये समाविष्ट केला जाईल.
५. थेट उद्योगांशी जोडणी: कॅपस्टोन प्रकल्प, एन्ड-टू-एन्ड एआय सोल्यूशन इंजिनिअरिंग आणि 'लो-कोड, नो-कोड' (Low-code/No-code) साधनांचा वापर विद्यार्थ्यांना शिकवला जाईल.
६. जबाबदार एआय (Responsible AI): एआय प्रशासनाचा (AI Governance) समावेश स्वतंत्र विषय म्हणून न करता, प्रत्येक सत्रात तो मुख्य विषयासोबतच शिकवला जाईल.
प्राध्यापकांचेही होणार 'स्पेशल ट्रेनिंग'; उद्योगांमधील तज्ज्ञ घेणार क्लास
केवळ अभ्यासक्रम बदलून चालणार नाही, तर तो शिकवणाऱ्या प्राध्यापकांची क्षमता वाढवणे गरजेचे असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. यासाठी:
प्राध्यापकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम (Train-the-Trainer) राबवले जातील.
सध्याच्या उद्योग साधनांशी सुसंगत अशा आधुनिक प्रयोगशाळा (Modern Labs) संस्थांमध्ये उभारल्या जातील.
उद्योग क्षेत्रातील अनुभवी दिग्गजांना (Industry Professionals) संस्थांमध्ये 'संलग्न प्राध्यापक' (Adjunct Faculty) म्हणून नियुक्त केले जाईल, जेणेकरून आयटी कंपन्यांमधील थेट अनुभव विद्यार्थ्यांना वर्गातच मिळेल.
"उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या काळात आपल्या विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर स्पर्धा करता यावी, यासाठी अभ्यासक्रमाची पुनर्रचना आणि पायाभूत सुविधांचा विकास करणे ही काळाची गरज आहे. उद्योग आणि शिक्षण क्षेत्राच्या या भागीदारीमुळे भारतीय तरुण जागतिक एआय क्रांतीचे नेतृत्व करतील."
— अश्विनी वैष्णव, केंद्रीय आयटी आणि तंत्रज्ञान मंत्री