राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस? छगन भुजबळ आणि पार्थ पवार यांच्यातील शाब्दिक चकमकीची जोरदार चर्चा...

Share:
Main Image
Last updated: 29-May-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २९ मे - अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील (अजित पवार गट) अंतर्गत अस्वस्थता आणि संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि पार्थ पवार यांच्यात एका मोठ्या कंत्राटावरून (टेंडर) जोरदार शाब्दिक वाद झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे. यापूर्वी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या ज्येष्ठ नेत्यांशीही पार्थ पवार यांचे खटके उडाल्याची चर्चा असतानाच, आता थेट भुजबळांशी आमने-सामने आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

वादाचे नेमके कारण काय?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व वाद अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्यातील अन्नधान्य वाहतूक निविदेवरून (टेंडर) सुरू झाला. या विभागाकडून नुकत्याच नवीन निविदा काढण्यात आल्या आहेत. राज्य स्तरावरील हे टेंडर एका ठराविक ठेकेदाराला देण्यात यावे, अशी पार्थ पवार यांची इच्छा होती, असे बोलले जाते. यासाठी त्यांनी संबंधित ठेकेदाराला भुजबळांकडे पाठवले होते. मात्र, अशा पद्धतीने नियमाबाह्य जाऊन कोणत्याही एका ठराविक ठेकेदाराला काम देण्यास भुजबळांनी स्पष्ट नकार दिला. "आजपर्यंत पक्षातील कोणत्याच वरिष्ठ नेत्याने मला असे सांगितले नव्हते," अशा कडक शब्दांत भुजबळांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. याच मुद्द्यावरून दोघांमध्ये फोनवर किंवा प्रत्यक्ष शाब्दिक बाचाबाची झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नेत्यांची अधिकृत भूमिका:

"आमच्यात कसलाही वाद नाही, ऑनलाइन प्रक्रिया सुरू" - छगन भुजबळ

"आम्हा दोघांमध्ये कसलीही वादावादी झालेली नाही. काही गोष्टी समजुतीने करायच्या असतात, याचा अर्थ आमच्यात वाद झाला असा होत नाही. टेंडर सध्या कोर्टात अडकले आहे. मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी दिली असून ही सर्व ऑनलाइन प्रक्रिया आहे. त्या माध्यमातून जे पात्र ठरतील, त्यांनाच टेंडर दिले जाईल. असे कोणालाही उठून टेंडर देता येत नाही. सध्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समितीमार्फत कागदपत्रांची तपासणी सुरू असून, कोणालाही कार्यादेश (Work Order) देण्यात आलेला नाही."

Advertisement

"माझ्याविषयी जाणीवपूर्वक चुकीच्या बातम्या" - पार्थ पवार

"माझ्याविषयी जाणीवपूर्वक चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. छगन भुजबळ यांच्याशी माझा कोणताही वाद झालेला नाही. मी कोणत्याही शासकीय कामात किंवा टेंडर प्रक्रियेत हस्तक्षेप केलेला नाही."

आधी पटेल, तटकरे अन् आता भुजबळ!

अजित पवारांच्या पश्चात पक्षात आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी नव्या आणि जुन्या पिढीत संघर्ष सुरू असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी पक्षावरील नियंत्रणावरून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे विरुद्ध पार्थ पवार असा वाद रंगला होता. तो वाद शांत होत नाही तोच भुजबळांसोबत खटके उडाल्याचे वृत्त समोर आले.

पक्षाच्या हितचिंतकांमध्ये चिंता

पक्ष सध्या ज्या कठीण आणि संवेदनशील परिस्थितीतून जात आहे, अशा काळात पार्थ पवार यांचे पक्षातील एकामागून एक ज्येष्ठ आणि वजनदार नेत्यांशी वारंवार खटके उडणे हे राजकीयदृष्ट्या मारक ठरू शकते, अशी चिंता राष्ट्रवादीच्या हितचिंतकांकडून व्यक्त केली जात आहे. दोन्ही नेत्यांनी जाहीरपणे हा वाद फेटाळला असला, तरी पडद्यामागे बरेच काही शिजत असल्याचे या घडामोडींवरून स्पष्ट होत आहे.

Advertisement

Comments

No comments yet.