मुंबई, (प्रतिनिधी) २८ मे - "NEET परीक्षेतील पेपरफुटी रोखण्यासाठी थेट भारतीय वायुदलाची (Air Force) मदत घेऊन प्रश्नपत्रिका पोहोचवण्याबाबत केंद्र सरकारच्या बैठकीत चर्चा सुरू असल्याचे समोर येत आहे. यावरून केंद्र सरकारला समस्येचे मूळच कळालेले नाही, हे स्पष्ट होते. पेपरफुटीचे खरे मूळ पेपर सेट करणाऱ्या लोकांमध्ये आहे. असे असताना 'NTA' (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) या संस्थेचा गलथान कारभार आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना वाचवण्याचा खटाटोप सरकार का करत आहे? याचे उत्तर देशाला हवे आहे," असा घणाघाती हल्ला मनसे आणि इतर विरोधी पक्षांपाठोपाठ आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. 'NEET' परीक्षेतील गोंधळ आणि पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाद्वारे केंद्र सरकारच्या धोरणांवर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला असून, २४ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवण्याची मागणी केली आहे.
हवाई दलाला पेपर वाटपाचे काम? धोरणांवर प्रश्नचिन्ह:
रोहित पवार म्हणाले की, देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र तैनात असलेल्या भारतीय हवाई दलाला आता एका परीक्षेचे पेपर वाटप करण्याचे काम दिले जात आहे. केंद्र सरकार अशी तकलादू धोरणे आखत आहे. सरकारच्या या भूमिकेवर कडाडून टीका करताना त्यांनी "दुखणे पोटाचे अन् उपचार डोक्याला... असा उपचार करणारा डॉक्टर असेल तर रुग्ण मरणारच, हे सरकारने ध्यानात घ्यावे," असा टोला लगावला.
'आग रामेश्वरी अन् बंब सोमेश्वरी!'
पेपरफुटी रोखण्यासाठी मूळ समस्येकडे दुर्लक्ष करून भलतेच उपाय शोधणाऱ्या केंद्र सरकारला रोहित पवारांनी धारेवर धरले. "सरकारने 'आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी' सारखे धंदे आता बंद करावेत. मूळ यंत्रणेत सुधारणा करण्याऐवजी दुसरीकडेच लक्ष भरकटवले जात आहे. या संपूर्ण प्रकरणाला जबाबदार असलेल्या 'NTA' वर नेमकी काय कारवाई केली, हे सरकारने आधी सांगावे," अशी मागणी त्यांनी केली.
२४ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न
देशभरातील २४ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या दोषींवर आणि एनटीएच्या कारभाऱ्यांवर कडक कारवाई कधी होणार, असा सवाल आता विरोधकांकडून सातत्याने विचारला जात आहे. लातूरमधील क्लासेसवर सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर, रोहित पवारांनी थेट दिल्लीतील मुख्य सूत्रधारांवर आणि एनटीएमधील त्रुटींवर बोट ठेवल्याने या प्रकरणातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे आहेत.