शिर्डी, (प्रतिनिधी) २८ मे - शिर्डीच्या श्री साईबाबांच्या दरबारात केवळ उद्योगपती किंवा श्रीमंत भक्तच दानशूरपणा दाखवतात असे नाही, तर सामान्य भाविकही आपल्या श्रद्धेपोटी भरभरून दान करत असतात. याचाच प्रत्यय नुकताच शिर्डीत आला आहे. शिरूर (जि. पुणे) येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने आपल्या शेतात पिकवलेला तब्बल ३ हजार ५०७ किलो सेंद्रिय केशर आंबा साईचरणी प्रसाद म्हणून अर्पण केला आहे.
शिरूर तालुक्यातील नारायणवाडी (नारायणबाग) येथील प्रगतशील शेतकरी रवी नारायण कराळे यांनी ही अनोखी भक्ती सेवा रुजू केली आहे. कराळे हे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या शेतात पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने केशर आंब्याचे उत्पादन घेतात. आपल्या घामातून पिकलेल्या या फळांचा थेट लाभ शिर्डीत येणाऱ्या सर्वसामान्य भाविकांना व्हावा, या पवित्र भावनेने त्यांनी हा संपूर्ण आंबा श्री साईबाबा संस्थानला सुपूर्द केला.
रासायनिक खतमुक्त आणि आरोग्यदायी प्रसाद
या आंब्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी कोणत्याही रासायनिक खतांचा किंवा औषधांचा वापर करण्यात आलेला नाही. पूर्णपणे नैसर्गिक आणि सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला हा आंबा अत्यंत चविष्ट आणि आरोग्यासाठी उत्तम आहे.
उद्यापासून मिळणार आमरसाचा प्रसाद
शेतकरी रवी कराळे यांनी दान केलेल्या या ३,५०७ किलो केशर आंब्याचा रस आता साईबाबा संस्थानच्या महाप्रसादालयात तयार केला जाणार आहे. उद्यापासून शिर्डीत येणाऱ्या देश-विदेशातील लाखो भाविकांना दुपारच्या आणि रात्रीच्या भोजन प्रसादासोबत या सेंद्रिय आमरसाचा आस्वाद घेता येणार आहे. एका शेतकऱ्याने दाखवलेल्या या दातृत्वाचे आणि अनोख्या भक्तीचे शिर्डीत आणि सोशल मीडियावर कौतुक होत आहे.