त्र्यंबकेश्वरहून या तारखेला निघणार माऊलींची पालखी...  आषाढी वारीसाठी यंदा असे आहे नियोजन...

Share:
Main Image
Last updated: 26-May-2026

 

 

नाशिक (प्रतिनिधी), दि. २६ मे २०२६ -

आगामी आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील वारकरी, भाविक आणि नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काटेकोर नियोजन करावे, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी दिल्या आहेत. यंदाच्या आषाढी वारीसाठी भाविक २९ जून रोजी त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. या पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीबाबत आयोजित करण्यात आलेल्या दूरदृष्य संवाद प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) बैठकीत ते बोलत होते.

या आढावा बैठकीला नाशिक व मालेगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, निवासी वैद्यकीय अधिकारी, त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानचे अध्यक्ष ॲड. सोमनाथ घोटेकर व सचिव श्रीपाद कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालखी मार्गाची दुरुस्ती आणि वाहतूक नियंत्रण

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. राजपूत यांनी सांगितले की, पायी जाणाऱ्या पालखी मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम तातडीने पूर्ण करावे. ज्या ठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती सुरू आहे, तेथे वारकऱ्यांसाठी पर्यायी मार्गांची चोख व्यवस्था करण्यात यावी.

वाहतूक नियंत्रण, मजबूत बॅरिकेडिंग आणि सुरक्षित पायी मार्गाच्या नियोजनावर विशेष भर दिला जाईल.

Advertisement

पालखी मार्गावरील संभाव्य अपघातप्रवण ठिकाणी विशेष सुरक्षा उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पाणी, स्वच्छता आणि आरोग्य यंत्रणा सज्ज राहणार

स्वच्छ पाणी: वारकरी आणि दिंड्यांसाठी पालखी मार्गावर अतिरिक्त पाण्याचे टँकर उपलब्ध करून पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा नियमित पुरवठा केला जाईल.

स्वच्छता व निवारा: प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी चल (मोबाईल) शौचालयांची व्यवस्था असेल. तसेच वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी मार्गातील शाळा, सार्वजनिक इमारती आणि निवारा शेड उपलब्ध करून दिले जातील.

वैद्यकीय सेवा: पालखी सोहळ्यासोबत डॉक्टर, परिचारक, रुग्णवाहिका आणि औषधांचा मुबलक साठा तैनात राहील. याशिवाय पालखी मार्गावरील सर्व ग्रामीण व जिल्हा रुग्णालयांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

धरणे व जलाशय परिसरात वाढत्या दुर्घटनांबाबत चिंता

या बैठकीत जिल्ह्यातील धरणे आणि जलाशय परिसरात उन्हाळ्यामुळे वाढत असलेल्या बुडण्याच्या दुर्घटनांचाही गंभीर आढावा घेण्यात आला. नागरिक आणि तरुण मोठ्या संख्येने धरण परिसरात पोहण्यासाठी व आंघोळीसाठी जात असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे.

यावर प्रतिबंध घालण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकार्‍यांनी पाटबंधारे विभागाला तात्काळ निर्देश दिले आहेत. त्यानुसार, जिल्ह्यातील सर्व धोकादायक व संवेदनशील ठिकाणांची यादी तयार केली जाईल. या प्रवेशबंदी क्षेत्रांमध्ये मजबूत बॅरिकेडिंग करणे, इशारा देणारे फलक लावणे, स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सुरक्षा रक्षक तैनात करणे आणि नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबवणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.

बैठकीच्या शेवटी संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानचे अध्यक्ष ॲड. घोटेकर यांनी आषाढी वारीच्या अनुषंगाने भाविकांना आवश्यक असणाऱ्या विविध सेवा-सुविधांबाबत संस्थानाची बाजू मांडली.

Comments

No comments yet.