नाशिक, (प्रतिनिधी) २६ मे - नाशिककर स्वामीभक्तांसाठी अत्यंत आनंदाची आणि भाग्याची बातमी आहे. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ पालखी आणि पादुका परिक्रमणा वर्षाच्या २९ व्या वर्षानिमित्त शनिवार, दि. ३० मे ते बुधवार, ३ जून २०२६ या कालावधीत अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र पादुका नाशिक शहरात येत आहेत. या ५ दिवसीय परिक्रमेदरम्यान नाशिक शहरातील विविध भागात भरगच्च धार्मिक कार्यक्रम, भव्य मिरवणुका आणि दर्शन सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण शहर स्वामीभक्तीत न्हाऊन निघणार आहे.
नियोजन सभा उत्साहात संपन्न
या भव्य सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी रविवार, दि. २४ मे रोजी तिडके कॉलनी येथील 'ऋग्वेद हॉल'मध्ये नाशिकमधील स्वामीभक्त आणि सेवेकऱ्यांची एक महत्त्वाची नियोजन सभा उत्साहात पार पडली. या सभेला विश्वस्त शामशेठ तांबोळी, विश्वस्त जगदीशअण्णा पाटील, खजिनदार संदीप खैरनार आणि सहखजिनदार केदार कुलकर्णी प्रामुख्याने उपस्थित होते. या सोहळ्याचे व्यवस्थापन चोख व्हावे, यासाठी विविध समित्यांची स्थापना करून सेवेकऱ्यांवर जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
सोहळ्यासाठी विविध समित्यांची स्थापना
१. वैद्यकीय उपचार समिती: अक्कलकोटवरून पालखीसोबत येणाऱ्या वारकरी संप्रदायातील भाविकांची आरोग्यसेवा आणि वैद्यकीय तपासणी करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये डॉ. प्रवीण कोडीलकर, डॉ. दीप्ती कुलकर्णी, डॉ. श्रीपाद उपासनी, डॉ. रघुनंदन शुक्ल आणि डॉ. देवेन पाठक यांची निवड करण्यात आली आहे.
२. महाप्रसाद भंडारा समिती: दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांच्या महाप्रसादाची जबाबदारी विशाल तांबोळी, बाळू बत्तासे, मंदार तगारे, बळीराम चांडोले, राहुल जगताप, आनंद पाटील, सागर तांबोळी, रंगा दंडगव्हाळ आणि मिलिंद खाडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
३. मिरवणूक स्वयंसेवक समिती: पालखी मिरवणुकीदरम्यान शिस्त व शांतता राखण्यासाठी प्रशांत गाडगीळ, जयेश आमले, युवराज पाटील, अभिजीत तांबोळी, सिद्धेश खैरनार, नंदकुमार पतंगे, प्रवीण मुनोत, श्रीकांत भामरे, कृष्णा देवरे, प्रमोद जोशी आणि ओमकार खाडे आदींची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सेवेकऱ्यांची मोठी उपस्थिती
या नियोजन सभेस नाशिक शहरातील विविध भागांतील स्वामीभक्त आणि सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये भाऊमहाराज खैरनार, संतोष पोळ गुरुजी, दशरथ खेडकर, स्वरूपा खेडकर, पुरुषोत्तम कुलकर्णी, प्रशांत दिवटे, भारती कुक्कर, अश्विनी आमले, वंदना जोशी, मनीषा कासार, स्वाती गुंडाळे, श्रद्धा सोनवणे, वर्षा गायधनी, उत्तरा गायधनी, स्वाती पाठक, प्रशांत शिंदे, सुवर्णा चित्तेवार, संगीता माळवतकर, राजेश शिंगणे, अमित भालेराव, लक्ष्मण आहेर, मोहनिष गायधनी आदींनी उपस्थित राहून सोहळा यशस्वी करण्याचा संकल्प केला.
या पाच दिवसीय परिक्रमेमुळे नाशिकमध्ये अभूतपूर्व असे भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, जास्तीत जास्त स्वामीभक्तांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.