रामकाल पथ प्रकल्पात गोदावरीचा प्रवाह बदलणार? मनपा आयुक्त मनिषा खत्री म्हणाल्या...

Share:
Main Image
Last updated: 26-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २६ मे - रामकाल पथ प्रकल्पांतर्गत रामकुंडा परिसरातील कुंडांच्या सुरू असलेल्या विस्तारीकरणामुळे गोदावरी नदीच्या मूळ प्रवाहात बदल होण्याची निर्माण झालेली भीती अखेर दूर झाली आहे. दक्षिण वाहिनी श्री गोदावरी नदीच्या नैसर्गिक मूळ रचनेत कोणताही बदल केला जाणार नाही, अशी ग्वाही नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनिषा खत्री यांनी दिली आहे. त्यामुळे दक्षिण वाहिनी गोदावरीचे धार्मिक व पौराणिक स्थानमाहात्म्य पूर्णपणे अबाधित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Advertisement

'पूर्ववाहिनी' होण्याचा धोका टळला
भौगोलिक व धार्मिक इतिहासानुसार, पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवाहित होणारी श्री गोदावरी नदी नाशिकमधील प्रसिद्ध 'धनुष कुंडातून' दक्षिणेकडे वळते आणि त्यानंतर 'रामकुंडात' प्रवेश करते. या वैशिष्ट्यामुळेच तिला 'दक्षिण वाहिनी गोदावरी' म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, रामकाल पथ प्रकल्पांतर्गत सध्या या भागात कुंडांच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. या कामामुळे दक्षिण वाहिनी असलेल्या गोदावरीचा प्रवाह बदलून ती 'पूर्ववाहिनी' होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. यावरून नाशिकमधील गोदावरी प्रेमी आणि भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण होते.

प्रत्यक्ष पाहणी आणि बैठकीत निर्णय
या गंभीर विषयाची दखल घेत मनपा प्रशासन, आयुक्त मनिषा खत्री आणि गोदावरी प्रेमी देवांग जानी यांच्यासमवेत रामकुंड परिसराची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्यात आली. या पाहणीनंतर झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा मुख्य निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, धनुष कुंड, रामकुंड आणि सीताकुंड यांच्या मूळ नैसर्गिक रचनेला आणि प्रवाहाला कोणताही धक्का न लावता पुढील विकासकामे केली जातील, असे मनपा प्रशासनाकडून निश्चित करण्यात आले आहे. मनपाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे जानी यांच्यासह गोदावरी प्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे

Comments

No comments yet.