नाशिक, (प्रतिनिधी) २६ मे - कांद्याला मिळत असलेल्या कवडीमोल भावामुळे गेल्या आठवड्यात लासलगाव येथे झालेल्या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपली ताकद दाखवून दिली होती. या 'ट्रेलर'मुळे खडबडून जागा झालेल्या केंद्र सरकारने चांदवड येथील नियोजित महामोर्च्याचा 'पिक्चर' समोर येण्यापूर्वीच अखेर एक पाऊल मागे घेतले आहे. केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयाने नाशिक जिल्ह्यातील रब्बी कांद्यासाठी 'किमान खात्रीशीर खरेदी किंमत' (MAPP) प्रति क्विंटल १५८० रुपये (म्हणजेच १५ रुपये ८० पैसे प्रति किलो) निश्चित केली आहे. मात्र, सरकारने केलेली ही वाढ म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखी असून, २५ रुपये किलोने खरेदी आणि १५ रुपये अनुदानाच्या मागणीसाठी आज (२६ मे) मुंबई-आग्रा हायवेवर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे.
सरकार अजूनही '१२ आणि १५' रुपयातच खेळतंय!
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे सरकारने नाफेडच्या खरेदी दरात १२ रुपये ३५ पैशांवरून १५ रुपये ८० पैसे अशी वाढ केली असली, तरी हा निर्णय शेतकऱ्यांना मान्य नाही. आज प्रत्यक्ष बाजारात शेतकऱ्याला कांद्याचा उत्पादन खर्चच १८ ते २० रुपये प्रति किलो येत आहे. अशा स्थितीत सरकार अद्यापही १२ आणि १५ रुपयांच्या घरातच खेळत आहे. शेतकऱ्यांची किमान २५ रुपये किलोने खरेदी करण्याची रास्त मागणी असताना, सरकार अवघ्या ३ रुपयांची दरवाढ करून बोळवण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा संताप शेतकरी व्यक्त करत आहेत.
...तर मुंबई-आग्रा हायवेवर गाड्या एक इंचही पुढे सरकू देणार नाही!
"२५ रुपये दराने कांद्याची खरेदी केल्याशिवाय आणि आधी विक्री केलेल्या कांद्याला प्रति किलो १५ रुपये प्रमाणे अनुदान दिल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही," असा सज्जड दम शेतकरी संघटनांनी सरकारला दिला आहे.
केंद्र सरकारला शेतकऱ्यांची खरी ताकद दाखवून देण्यासाठी आज, दि. २६ मे रोजी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनादरम्यान महामार्गावरील गाड्या एक इंचही पुढे सरकू दिल्या जाणार नाहीत, अशी आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना आवाहन:
केंद्र सरकारच्या या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी आणि आपल्या हक्काचा न्याय मिळवण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील समस्त शेतकरी बांधवांनी आज चांदवड येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा क्रांती महामोर्चा आणि आंदोलनासाठी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आले आहे.