नाशिक, (प्रतिनिधी) २२ मे - आगामी खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते आणि कीटकनाशके मिळावीत म्हणून कृषी विभागाने नाशिक जिल्ह्यात मोठी तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत नियमबाह्य व्यवहार आणि साठ्यामध्ये अनियमितता आढळून आल्याने जिल्ह्यातील १७ कृषी सेवा केंद्रांचे परवाने तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली.
'e-POS' मधील गैरप्रकार आले समोर
कृषी पथकांनी केलेल्या आकस्मिक तपासणीत अनेक केंद्रांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या. काही ठिकाणी खत व कीटकनाशक विक्रेत्यांनी 'e-POS' यंत्राद्वारे व्यवहार करताना कंपन्यांकडून प्राप्त झालेले पोचपावती (Acknowledgement) वेळेत स्वीकारली नव्हती. याशिवाय, e-POS प्रणालीमध्ये दिसणारा ऑनलाईन साठा आणि दुकानातील प्रत्यक्ष उपलब्ध खतांचा साठा यामध्ये मोठी तफावत आढळून आली. रोख वह्या (Cash Books) आणि स्टॉक नोंदवहीमध्ये विसंगती असणे, खत वितरणाच्या नोंदी न ठेवणे या कारणांमुळे केंद्रांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, संबंधितांकडून समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्याने अखेर निलंबनाचा बडगा उचकण्यात आला.
आतापर्यंत ८६ केंद्रांवर कारवाई
जिल्ह्यात १ एप्रिल २०२६ पासून सुरू असलेल्या या विशेष मोहिमेत खत, बियाणे आणि कीटकनाशक विक्रीतील विविध गैरप्रकारांमुळे आतापर्यंत एकूण ८६ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत बोगस किंवा निकृष्ट दर्जाच्या निविष्ठांची विक्री खपवून घेतली जाणार नाही. तसेच निर्धारित दरापेक्षा (MRP) जादा दराने विक्री करणाऱ्या केंद्रांवर थेट कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा माने यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आवाहन: पक्के बिल नक्की घ्या!
कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, खते किंवा बियाणे खरेदी करताना केवळ अधिकृत केंद्रांकडूनच खरेदी करावी. खरेदी केल्यानंतर त्याचे पक्के बिल घेणे बंधनकारक असून सर्व व्यवहार 'e-POS' यंत्राद्वारेच होत असल्याची खात्री करावी. जर एखादे केंद्र जादा दर आकारत असेल किंवा बोगस बियाणे देत असेल, तर तात्काळ तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा.
येथे नोंदवा तक्रार (जिल्हा नियंत्रण कक्ष):
शेतकरी आपल्या तक्रारी ७८२१०३२४०८ या क्रमांकावर थेट कॉल करून किंवा व्हॉट्सअॅप (WhatsApp) द्वारे मेसेज पाठवून नोंदवू शकतात.
तालुकानिहाय गुणवत्ता नियंत्रण कृषी अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक:
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी कृषी विभागाने सर्व १५ तालुक्यांच्या गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांचे शासकीय मोबाईल क्रमांक जाहीर केले आहेत:
तालुका मोबाईल क्रमांक तालुका मोबाईल क्रमांक
नाशिक 9185215369
कळवण 9185215274
इगतपुरी 9185215629
देवळा 9185215305
त्र्यंबकेश्वर 9185215400
दिंडोरी 9185215228
पेठ 9185215487
सुरगाणा 9185215324
निफाड 9011619675
मालेगाव 9185215517
सिन्नर 9185215128
बागलाण 9185215066
येवला 9185215584
नांदगाव 9185215021
चांदवड 9185215172